लोंघेत मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
By admin | Published: September 20, 2015 10:28 PM2015-09-20T22:28:20+5:302015-09-21T00:06:34+5:30
मूर्तींना कोणतेही रंगकाम वर्ज्य : लोंघेचा आदर्श अन्य गावांनी घेतल्यास प्रदूषण थांबण्यास मदत
प्रकाश पाटील -- कोपार्डे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर कोल्हापूरच्या पश्चिमेला अवघ्या १७ कि.मी.वर असलेल्या लोंघे गावात नैसर्गिक मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्याची प्रथा आहे. येथील ग्रामस्थ घरगुती गणपती, तर तरुण मंडळे सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना केवळ मातीपासून बनविलेल्या मूर्तीचीच करतात.
लोेंघे हे गाव निसर्गरम्य अशा गगनबावडा तालुक्यात आहे. गावची लोकसंख्या जेमतेम तीन ते साडेतीन हजार आहे. येथे सर्व क्षेत्रांत दिसणाऱ्या थाटामाटाचे दर्शन दिसते. अपवाद आहे तो गणपतीच्या मूर्तींचा. गावात दोन तरुण मंडळे आहेत, तर घराघरांत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. सध्या सर्वत्र रंगीत शाडूचे, चिकनमाती, प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या आकर्षक मूर्तींकडे सर्वांचा मोठा कल आहे. लोंघे गावात मात्र आजही नैसर्गिक चिखल मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींचीच प्रतिष्ठापना केली जाते. एवढेच नाही, तर या मूर्तींना कोणतेही रंगकाम वर्ज्य आहे. जशी माती, तशीच कोरीव व आकर्षक मूर्ती. मूर्तींच्या आकारातही भव्यदिव्यपणा नाही. गणेश मंडळे सर्वसाधारण चार ते पाच फू ट उंचीची शुद्ध नैसर्गिक मातीपासून बनविलेल्या मूर्र्तीचीच प्रतिष्ठापना करतात. या मूर्तींनाही कोणताही रंग लावत नाहीत. अशाच प्रकारे घरगुती गणपतींच्या मूर्ती बसविल्या जातात. त्यांचाही आकार दीड ते दोन फुटांच्यावर नसतो. मात्र, गणपतीच्या सभोवती आकर्षक सजावट करून मकर बनविण्यात हे गाव मागे नाही.
गावात घरगुती गणपतीव्यतिरिक्त दोन ते तीन फूट उंचीच्या गणेशमूर्तींची स्थापना केली जाते; पण कोणताही रंग अथवा शाडूचा वापर होत नाही. याचे नेमके कारण सांगता येत नसले, तरी देवाचा कोप होऊ नये ही भावना त्या पाठीमागे आहे.
- ज्ञानदेव मोळे, ग्रामस्थ
गावातील ग्रामदेवतेला नैसर्गिक मातीच्याच गणेशमूर्ती मान्य असल्याचे बोलले जाते. पूर्वजांपासून ही प्रथा सुरू आहे.
- अजित पाटील, ग्रामस्थ लोंघे