खरेदीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीप्रमुखास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 05:30 PM2017-10-31T17:30:33+5:302017-10-31T17:38:42+5:30
खरेदी करण्याचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील प्रमुखास कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून नामांकित कंपन्यांची घड्याळे, कॅमेरे, मोबाईल असा सुमारे तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वस्तूंच्या खरेदीचा बहाणा करून फसवणूक केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
कोल्हापूर : खरेदी करण्याचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील प्रमुखास कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. त्याच्याकडून नामांकित कंपन्यांची घड्याळे, कॅमेरे, मोबाईल असा सुमारे तीन लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अनिल तुळशीराम जोशी (वय ३७, शांतीनगर, मास्टरवाडी, मालाड (पश्चिम) मुंबई) असे संशयित टोळीप्रमुखाचे नाव आहे. त्याने कोल्हापुरातून नामांकित कंपनीची १५, तर नागपुरातून १० घड्याळे तसेच चेन्नईतून दोन लॅपटॉप, रायपुरातून तीन कॅमेरे, डेहराडून येथून १०, तर विशाखापट्टणम येथून सहा मोबाईल अशा वस्तूंच्या खरेदीचा बहाणा करून फसवणूक केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कावळा नाका येथील एका तारांकित हॉटेलमधून दोन महिन्यांपूर्वी नामांकित कंपनीची घड्याळे अशाच पद्धतीने फसवणूक करून सुमारे १५ लाख ८०० रुपयांची घड्याळे विक्रम शर्मा असे खोटे नाव सांगून अनिल जोशी व त्याच्या साथीदारांनी नेली होती. साईक्स एक्स्टेन्शन येथील एका घड्याळाच्या दुकानदाराला हा गंडा घातला होता. याबाबत शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. तपासात अनिल जोशी याने ही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्रात पूर्वी अशा प्रकारचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांची माहिती घेतली. २०१२ मध्ये सहार पोलीस ठाणे, मुंबई येथे असा गुन्हा घडला असल्याचे समजले. त्यानुसार तेथून संशयित आरोपीचे छायाचित्र व कोल्हापुरातील या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज जुळविले असता संशयित अनिल तुळशीराम जोशी व त्याचे साथीदार यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी जोशी याची माहिती घेतली असता चार वर्षांपासून वडोदरा (गुजरात) तो येथे राहत असल्याची तसेच आईला मालाड येथे भेटण्यासाठी अधून-मधून येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वडोदरा या ठिकाणी जाऊन अनिल जोशी याचा छायाचित्राद्वारे शोध घेतला. त्यावेळी सध्या तो मालाड या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मालाडला जाऊन त्याला पकडून कोल्हापुरात आणले. त्याला शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक राजेंद्र सानप, युवराज आठरे, अमोल माळी व पोलीस कॉन्स्टेबल सुजय दावणे, आसिफ कलायगार, श्रीकांत पाटील, संजय कुंभार, राजू आडूळकर, संजय हुंबे, किरण गावडे, प्रदीप नाकील, अमित सर्जे, राजेंद्र निगडे, अमर वासुदेव, अमर आडसुळे, महादेव गुरव यांनी केली.