‘चांगभलं’च्या गजराने जोतिबा डोंगर दुमदुमला
By admin | Published: February 29, 2016 12:48 AM2016-02-29T00:48:14+5:302016-02-29T00:52:04+5:30
पहिला खेटा उत्साहात : कोल्हापूर ते जोतिबा डोंगर चालत आलेल्या भाविकांच्या गर्दीने पायवाटा फुलल्या; रात्री उशिरापर्यंत भाविकांचा ओघ
जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा पहिला रविवार खेटा मोठ्याधार्मिक उत्साहात पार पडला. ‘चांगभलं’ गजरात पहाटेपासूनच कोल्हापूर ते जोतिबा डोंगर या पायवाटा हजारो भाविकांच्या गर्दीने सफुलून गेल्या होत्या.जोतिबा देवाच्या पहिल्या रविवार खेट्याला पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली. कोल्हापूर ते जोतिबा डोंगर या पायवाटेने चालत आलेल्या भाविकांनी ‘चांगभलं’चा गजर करीत जोतिबा देवाचे दर्शन घेतले. सकाळी भाविकांची मोठी गर्दी झाली. मंदिरासभोवती चार-पाच दर्शन रांगा लागल्या. दर्शन रांग नियंत्रणासाठी कोडोली पोलीस, देवस्थान व पुजारी समितीचे कर्मचारी तैनात होते. सकाळी अभिषेक, महापूजा, धुपारती सोहळा झाला. दुपारी अभिषेक, महापूजा, सायंकाळी आरती, रात्री आठ वाजता पालखी सोहळा झाला. रात्री अकरापर्यंत भाविक जोतिबा दर्शनासाठी येत होते.
जोतिबा खेट्यासाठी आलेल्या भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. व्यापार संकुल, शासकीय विश्रामधाम परिसरात चार चाकी व अवजड वाहने पार्क केली होती. जोतिबा
मंदिराकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मंदिराच्या आवारात दुपदरी दर्शन रांगा लागल्या होत्या. एस. टी. महामंडळाने जादा गाड्याची सोय केली. ग्रामपंचायतीने स्वच्छता व पाणीपुरवठ्याची सोय केली होती. (वार्ताहर)
कोल्हापूरकरांची गर्दी
जोतिबा खेटे यात्रेला कोल्हापूरच्या भाविकांची लक्षणीय गर्दी असते. सलग पाच रविवार हे खेटे पायी चालत पूर्ण करतात. पहाटेच्या वेळी महाविद्यालयीन व तरूणवर्गाची मोठी गर्दी असते. शासकीय नोकरदार व महिलावर्गाची दिवसभर गर्दी सुरूच असते. सायंकाळनंतर दुकानदार व चाकरमानी या कोल्हापूरकरांची गर्दी ठरलेली असल्याने या यात्रेला कोल्हापूरकरांचे खेटे असे म्हटले जाते.
मंदिरात गावभंडारा
संभाजी भगवान दमाने
( सांगली ) या भाविकाने जोतिबा मंदिरात गावभंडारा घातला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. चालत आलेल्या भाविकांसाठी तरूण मंडळे, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी प्रसाद वाटप
केला.