जोतिबा मंदिरात मानाची सासनकाठी दाखल
By admin | Published: March 22, 2015 01:11 AM2015-03-22T01:11:36+5:302015-03-22T01:12:06+5:30
उंट, घोडे, सवाद्य मिरवणुकीने मानाच्या सासनकाठीचे स्वागत
जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर गुढीपाडवा मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला. जोतिबा मंदिरात गुढी पूजन, नवीन वर्षाचे पंचांग वाचन, गूळ-कडूलिंब वाटपाचा कार्यक्रम झाला. हिम्मत बहाद्दूर चव्हाणांची सासनकाठी जोतिबा मंदिरात दाखल झाली.
दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा ३ एप्रिलला होणार आहे. यानिमित्त शनिवारपासूनच श्री जोतिबा मंदिरात मानाच्या सासनकाठ्या येण्यास प्रारंभ झाला आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मत बहाद्दूर चव्हाण यांची जोतिबा मंदिरात प्रथम सासनकाठी दाखल होते. शनिवारी सकाळी ११ वाजता उंट, घोडे, सवाद्य मिरवणुकीने या मानाच्या सासनकाठीचे स्वागत झाले. मंदिर प्रदक्षिणा काढून सदरेसमोर ही मानाची सासनकाठी उभी करण्यात आली. या सासनकाठीसमवेत रणजितसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, महेंद्रसिंह चव्हाण, सुजय परदेशी उपस्थित होते. दुपारी १२ वाजता नवीन वर्षाचे पंचांग वाचन ग्रामोपाध्ये केरबा उपाध्ये यांनी केले. यावेळी ‘श्रीं’चे पुजारी, देवसेवक, गावकर, देवस्थान समितीचे प्रभारी लक्ष्मण डबाणे, सिंधीया ट्रस्टचे प्रभारी आर. टी. कदम, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, पं. स. पन्हाळाचे माजी सभापती विष्णुपंत दादर्णे, समस्त उपाध्ये, ग्रामस्थ, पुजारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गूळ व कडूलिंबाचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)