जोतिबा यात्रेचे वेध -एसटीच्या १७५ बसेस धावणार-सेवा-सुविधेसाठी नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:39 AM2018-03-27T00:39:55+5:302018-03-27T00:39:55+5:30
कोल्हापूर : देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेचे वेध भाविकांना लागले आहेत. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ म्हणत महाराष्ट्र, कर्नाटकमधून आलेल्या
कोल्हापूर : देशभरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या ‘दख्खनचा राजा’ श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेचे वेध भाविकांना लागले आहेत. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ म्हणत महाराष्ट्र, कर्नाटकमधून आलेल्या भाविकांच्या बैलगाड्या, त्यांना सुविधा पुरविण्यासाठी संस्थांची चाललेली लगबग, परिवहन महामंडळासह ग्रामपंचायत, जिल्हा-पोलीस प्रशासनाची सुरू असलेली तयारी अशी घाई सर्वत्र दिसत आहे.
चैत्रात होणारी यात्रा जोतिबा देवस्थानची सर्वांत मोठी यात्रा असते. यासाठी देशभरातील विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित असतात. यंदा ही यात्रा शनिवारी (दि. ३१) होत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध स्वयंसेवी संस्थांनी भाविकांच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी नियोजन केले आहे. भाविकांसाठी पुजाºयांकडून रुग्णवाहिकेची सुविधा
जोतिबा : जोतिबा भाविकांसाठी स्थानिक पुजाºयांनी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात्रेसाठी येणाºया भाविकांना रुग्ण सेवा मिळावी या हेतूने जोतिबा स्थानिक पुजाºयांनी मंदिराजवळ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिलीआहे. गर्दीच्या वेळी भाविकांना रुग्ण सेवा तत्काळ मिळावी या उद्देशानेही रुग्णवाहिका मंदिराशेजारी उपलब्ध करून दिली आहे. नाथ सेवा ग्रुप या रुग्णवाहिकेचे व्यवस्थापन करणार आहे. सामाजिक बांधीलकीतून ही रुग्णसेवा पुजाºयांच्या वतीने दिल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आपत्कालीन सेवेसाठी अग्निशामक यंत्र, वायरलेस यंत्रणेसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
‘परिवहन’तर्फे जादा बसेस..
यात्रा काळात डोंगरावर राज्य परिवहन महामंडळाच्या १७५ बसेस धावणार असून, भाविकांसाठी जादा बसफेºयांचीही सुविधा असणार आहे. यात्रेनंतर पुढे पाच रविवारी होणाºया पाकाळणी यात्रेसाठीही जादा बसफेºयांचे नियोजन आहे. कोल्हापूर विभागातील सर्व आगारांच्या बसस्थानकांतून जोतिबा डोंगर अशी थेट बससेवा भाविकांना मिळणार आहे. तसेच पंचगंगा नदीघाट येथे तात्पुरते यात्रा शेड उभारण्याची तयारी सुरू आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसस्थानकावर क्यू रेलिंगची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. दर पाच मिनिटाला बसफेरी ठेवण्यात येणार आहे. तरी एस. टी. बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैलगाड्यांची परंपरा कायम..
पूर्वी वाहनांनी सोय नसल्याने भाविक बैलगाडीतून दिवसेंदिवस प्रवास करून यात्रेला जायचे. आता अनेक प्रकारची वाहने दिमतीला असली तरी अजूनही या यात्रेला बैलगाड्यांनी जाण्याची परंपरा दिसून येते. सासनकाठ्या घेऊन अशा हजारो बैलगाड्या डोंगरावर येतात. त्याआधी त्यांचा मुक्काम कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर असतो.
नदीघाट स्वच्छता
शाहू मॅरेथॉन, शाहू जीवन विकास ट्रस्ट व पंचगंगा घाट संवर्धन समिती व महापालिका यांच्यावतीने यात्रेनिमित्त आज, मंगळवारी पंचगंगा नदीघाटाची स्वच्छता करण्यात येणार आहे तसेच येथे यात्रेकरूंसाठी तात्पुरती स्नानगृहे तयार करण्यात येणार आहेत.
पंचगंगा घाटावर शुक्रवारपासून अन्नछत्र
शिवाजी चौक तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेकरूंसाठी पंचगंगा नदीघाटावर मोफत अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे. यंदा शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस हे अन्नछत्र सुरू राहील. यात्रेकरूंसाठी कुर्मापुरी, कांदाभजी, जिलेबी, शिरा, मसालेभात असा मेनू असून जवळपास १ लाख यात्रेकरूंना याचा लाभ घेता येईल. अन्नछत्रासाठी नदीघाटावर चार हजार चौरस फुटांचा मंडप घालण्यात येत आहे. गणेश कॅटरर्सच्यावतीने जेवण बनविण्यात येणार आहे.