बालकल्याण संकुल समस्यांचा कानोसा : आयोगाच्या अध्यक्षांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:47 AM2017-11-15T00:47:32+5:302017-11-15T00:48:57+5:30
कोल्हापूर : बालदिनाच्या पार्श्वभूमीवर बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी मंगळवारी सकाळी संभाजीनगरातील बालकल्याण संकुलला भेट
कोल्हापूर : बालदिनाच्या पार्श्वभूमीवर बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी मंगळवारी सकाळी संभाजीनगरातील बालकल्याण संकुलला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी समिती सदस्यांनी बालविकास सक्षमीकरणासाठी जिल्ह्यातील तिन्हीही निरीक्षणगृह संस्थेत पूर्ण वेळ निवासी अधीक्षक उपलब्ध करून देण्याबरोबरच निरीक्षणगृहात असणारी रिक्त पदे भरावीत, आदी मागण्या केल्या.
बालकल्याण संकुलात आल्यानंतर संस्थेच्या मानद सचिव पद्मजा तिवले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या हस्ते बालदिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बालकल्याण संकुलाची पाहणी करून जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा आढावा घेतला व समिती सदस्यांशी चर्चा केली. त्यामध्ये सदस्यांनी समस्यांचा पाढा मांडला.
मुलांच्या निरीक्षणगृहासाठी मंजूर १६ पदांपैकी ११ रिक्त पदे भरावीत, मुलींच्या निरीक्षणगृहातील मंजूर १२ पैकी ७ रिक्त पदे भरावीत, दोन्हीही निरीक्षणगृहासाठी आवश्यक असणारे अधीक्षकपदही भरावे, तसेच वर्षभर वेतनेतर अनुदान वेळेत मिळत नसल्याची तक्रार करताना याही प्रमुख मागणीकडे आयोगाने लक्ष द्यावे, असाही आग्रह सदस्यांनी धरला.
ही समस्या मांडताना जुन्या मान्यतेनुसार ही पदे रिक्त असल्याचे सांगताना नवीन नियमावलीनुसार या रिक्तपदांची संख्या आणखी वाढणार असल्याचेही सदस्यांनी जाणवून दिले. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली. अध्यक्ष घुगे यांनी, या मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करू तसेच जास्तीत जास्त समस्यांची तड लावू असेही आश्वासन दिले. त्यांना बालकल्याण संकुलातील विविध समस्यांबाबत मानद सचिव पद्मजा तिवले यांनी निवेदन दिले.
यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नितीन मस्के, बालकल्याण समिती अध्यक्ष प्रियदर्शनी चोरगे, सदस्य संजय देशपांडे, अतुल देसाई, अनिकेत निकेतन बालसुधारगृहाचे अधीक्षक पी. के. डवरी, मुलींच्या निरीक्षणगृहाच्या प्रभारी अधीक्षिका पद्मजा गारे, मुलांच्या निरीक्षणगृहाचे प्रभारी अधीक्षक सचिन माने, मुलींच्या बालसुधारगृहाच्या अधीक्षिका नजिरा नदाफ, शिशुगृहाचे समन्वयक अधीक्षिका कांचन हेबाळकर तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
मुलांशी मारल्या गप्पा
बालकल्याण संकुलात जिल्हा बालसंरक्षण कक्ष, बालकल्याण शिशुगृह, अनिकेत निकेतन बालगृह, मुलांची तसेच मुलींच्या निरीक्षणगृहात जाऊन आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी काही वेळ मुलांशी हितगूज करीत गप्पा मारल्या.
अनुदान रक्कम वाढवावी
बालसंगोपन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना नियमितपणे दरमहा अनुदान मिळावे, तसेच गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ अनुदान रकमेत वाढ केली नसल्याकडे आभास फौंडेशनचे अध्यक्ष अतुल देसाई यांनी लक्ष वेधले. या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी त्यांनी अध्यक्ष घुगे यांच्याकडे केली.