कोल्हापूरातील शालिनी स्टुडिओची जागा आरक्षीतच ठेवा, चित्रपट कलाकारांचा मनपावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 03:39 PM2017-12-16T15:39:47+5:302017-12-16T15:45:00+5:30
शालिनी स्टुडिओची जागा अन्य कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी वापरात न आणता या जागेवर केवळ स्टुडिओचेच आरक्षण ठेवण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर : हिंदी-मराठी चित्रपटाची वैभवशाली परंपरेचा ज्वलंत इतिहास बनून गेलेल्या येथील शालिनी स्टुडिओची जागा अन्य कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी वापरात न आणता या जागेवर केवळ स्टुडिओचेच आरक्षण ठेवण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कलाकार, तंत्रज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चाच्यावतीने प्रभारी उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.
मध्यवर्ती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी अकरा वाजता मोर्चाला सुरवात झाली. मोर्चात यशवंत भालकर, रणजीत जाधव, शरद चव्हाण, सतीश रणदिवे, सुरेखा शाह, छाया सांगावकर, शोभा शिराळकर, शुभांगी पेंडसे, स्वप्नील राजशेखर, संजय मोहिते,अर्जुन नलावडे, आकाराम पाटील, श्रीकांत डिग्रजकर यांच्यासह अनेक कलाकार, तंत्रज्ञ सहभागी झाले.
मोर्चा महानगरपालिकेवर येताच तेथे जोरदार घोषणाबाजी झाली. घोडेबाजार करणाऱ्या कारभाऱ्यांना जतनाच धडा शिकवेल, कोल्हापूरची सांस्कृतिक परंपरा मातीत गाडणाऱ्या कारभारी नगरसेवकांचा धिक्कार असो, शालिनी स्टुडिओचे आरक्षण कामय राहिले पाहिजे, कारभारी नगरसेवक तुमचे करायचे काय, खाली डोके वर पाय असे उल्लेख असलेले फलक हातात घेतले होते.
मोर्चाच्यावतीने महापालिकेचे प्रभारी उपायुक्त मंगेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. चित्रपट निर्मिती कमी होऊ लागल्याने ४७ एकर जमीनीचे भुखंड पाडून व्यावसायिकीकरण करण्यात येऊ लागले आहे. तथापि चित्रपट कलाकार तंत्रज्ञांनी आंदोलनाचे अस्त्र उगारल्यानंतर १३ हजार ८८० चौरस मिटर व २० हजार चौरस मिटर असे दोन भुखंड शालिनी स्टुडिओसाठी आरक्षीत ठेवण्यात आले. परंतु या जागावरील आरक्षणही उठविण्याचा खटाटोप सुरु झाला आहे. ही जागा आरक्षीतच ठेवावी, ती अन्य कोणत्याही व्यवसायासाठी देऊ नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.