कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी किशोरी पसारे, सचिवपदी अमित भिसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 07:51 PM2018-02-27T19:51:23+5:302018-02-27T19:51:23+5:30
शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील कमला महाविद्यालयाची विद्यार्थीनी किशोरी पसारे हिची, तर सचिवपदी साताऱ्याच्या आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशनचा विद्यार्थी अमित भिसे याची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. दोन वर्षांनंतर विद्यार्थी कल्याण मंडळाच्या निवडणूका झाल्या आहेत.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी कोल्हापुरातील कमला महाविद्यालयाची विद्यार्थीनी किशोरी पसारे हिची, तर सचिवपदी साताऱ्याच्या आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशनचा विद्यार्थी अमित भिसे याची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. दोन वर्षांनंतर विद्यार्थी कल्याण मंडळाच्या निवडणूका झाल्या आहेत.
किशोरी पसारे
विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्ष आणि सचिवपदासाठीच्या सन २०१७-१८ च्या निवडणुकीची अधिसूचना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जारी करण्यात आली. ही निवडणूक मंगळवारी झाली. या मंडळाच्या अध्यक्षपदासाठी न्यू कॉलेजचा सचिव अभिषेक श्रीराम आणि कमला महाविद्यालयाच्या किशोरी पसारे इच्छुक होते.
अमित भिसे
हे दोघे शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीशी संबंधित असल्याने अध्यक्षपदाची निवड बिनविरोध व्हावी याउद्देशाने अभिषेक याने माघार घेतली. त्यामुळे किशोरी हिची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली.
सचिवपदासाठी कराड येथील मंगलाताई जगताप महिला महाविद्यालयाची नम्रता काटवटे, पलूस येथील आर्ट सायन्स व कॉमर्स कॉलेजची शुभांगी नलवडे, सातारा येथील इस्मामसाहेब मुल्ला लॉ कॉलेजचा विशाल मांडरे आणि आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशन अमित भिसे यांनी अर्ज दाखल केले. यातील नम्रता, शुभांगी आणि विशाल यांनी माघार घेतल्याने अमितची बिनविरोध निवड झाली.
प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ग्रंथ भेट प्रदान करून किशोरी आणि अमित यांचा सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यार्थी कल्याण मंडळाचे समन्वयक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी काम पाहिले. निवडीनंतर किशोरी आणि अमित यांचे समर्थक, मित्र-मैत्रिणींनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
दरम्यान, अध्यक्षपदी निवड झालेली किशोरी पसारे सध्या कमला महविद्यालयात एम.ए. योगा अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. माजी नगरसेवक राजू पसारे यांची ती कन्या आहे. तिने सन २००९ मध्ये कमला महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थीनींचा ‘डी. एम.’ ग्रुप स्थापन केला असून त्याद्वारे ती सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे.
सचिवपदी निवड झालेला अमित भिसे हा आझाद कॉलेज आॅफ एज्युकेशनमध्ये बी. एड. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. त्याचे मूळ गाव निढळ (ता. खटाव) आहे. त्याचे वडील शेतकरी, तर आई गृहिणी आहेत. त्याने बी. एस्सी. अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकविला होता. विद्यापीठ अनुदान आयोगाची त्याला रँक होल्डर शिष्यवृत्ती मिळाली आहे.