(कोजिमाशि) कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेमधील नोकरभरती न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:24 AM2017-11-02T11:24:56+5:302017-11-02T11:43:31+5:30
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेमधील (कोजिमाशि) होणाऱ्या नोकर भरती विरोधात सहकार न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती संस्थेचे माजी सभापती संजय पाटील यांनी पत्रकातून दिली.
कोल्हापूर ,दि. ०२ : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेमधील (कोजिमाशि) होणाऱ्या नोकरभरतीविरोधात सहकार न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती संस्थेचे माजी सभापती संजय पाटील यांनी पत्रकातून दिली.
संस्थेचे ८७८८ सभासद असून, अकरा शाखांमध्ये सध्या ४८ कर्मचारी कार्यरत आहेत. पण मुख्य कार्यालय, मंगळवार पेठ शाखा व शाहूपुरी शाखा स्वतंत्र दाखवून जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे ३२ कर्मचारी भरतीस परवानगी घेतली आहे.
यापूर्वी २०१३-१४ मध्ये तत्कालीन संचालकांनी असाच प्रयत्न केला होता, त्याला न्यायालयाने स्थगिती दिली होती. सध्याच्या कर्मचाऱ्याच्या पगारावर २ कोटी २० लाख रुपये खर्च होत असताना नव्याने ३२ कर्मचाऱ्याची भरती कशासाठी?
वाढीव कर्मचाऱ्याच्या पगारावर दीड ते दोन कोटी रुपये पगारापोटी खर्च पडणार आहे. त्याचा परिणाम संस्थेवर होणार असून, संस्थेच्या नुकसानीस सर्वस्वी कारभारी संचालक जबाबदार राहतील.
याविरोधात सहकार न्यायालयात दाद मागितल्याचे संजय पाटील, राजेंद्र पाटील, बी. के. मोरे, प्रशांत पोवार, ए. एम. पाटील, एस. एस. कांबळे, आर. व्ही. करडे, एस. एस. पाटील, एम. जी. पाटील, बाळासो गिरीबुवा यांनी पत्रकात म्हटले आहे.
(कोजिमाशि) सभासदांची मागणी म्हणूनच नोकरभरती-संजय डवर
गेले पंधरा वर्षांत पतसंस्थेची उलाढाल सहा पटीने वाढली असून, शाखा विस्तारामुळे बहुतांशी शाखांचा डोलारा दोन-दोन कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. यामुळे सभासद व ठेवीदारांना वेळेत सेवा देता येत नसल्याने संचालक मंडळाने सर्वसाधारण सभेबरोबर सहकार खात्याची परवानगी घेऊन प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सभापती संजय डवर व तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी पत्रकातून दिली.
पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे २००२ ला चार हजार सभासद व ६२ कर्मचारी कार्यरत होते. त्यापेक्षा सहा पटीने व्यवहार वाढला, सेवानिवृत्त, राजीनामे व मयत या कारणाने पंधरा कर्मचारी कमी झाले. त्याचा ताण शाखांवर पडत असून, सहा शाखा केवळ दोन कर्मचाऱ्यांवर सुरू आहेत.
पूर्वीच्या मंडळींनी भरतीत नातेवाईकांचा भरणा केला, आम्ही तसे करणार नसून, स्टाफिंग पॅटर्नला अधीन राहून सभासद, सेवानिवृत्त सभासद, मयत सभासद यांच्या पाल्यांना प्राधान्य देणार आहे. लेखी, तोंडी परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांनाच संधी दिली जाणार आहे.
रोजंदारी वेतन पद्धतीवर कर्मचारी घेणार असून, सर्वसाधारण सभेत तक्रारदार संजय पाटील याचे समर्थन केले होते. मग आता तक्रार कशासाठी? निवडणुकीतील पराभवाने वैफल्यग्रस्त होऊन संजय पाटील संस्थेची बदनामी करत आहेत, पण हा डाव सभासद मोडीत काढतील, असे डवर व लाड यांनी पत्रकात म्हटले आहे.