कोल्हापूर : खंडणी देण्यास नकार दिल्याने मालिकेच्या सेटवर हल्ला, नऊ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 01:12 PM2018-08-07T13:12:10+5:302018-08-07T13:39:21+5:30
केर्ली (ता. करवीर) येथील एका बंगल्यामध्ये सुरु असलेल्या मराठी मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटवर खंडणीसाठी उपसरपंचासह नऊ जणांनी हल्ला करुन निर्मिती प्रमुख आणि दिग्दर्शकास बेदम मारहाण केली. याशिवाय शुटींगच्या साहित्यासह कारची तोडफोड केली. याप्रकरणी करवीर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून ही घटना सोमवारी (दि. ६) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथील एका बंगल्यामध्ये सुरु असलेल्या मराठी मालिकेच्या चित्रीकरणाच्या सेटवर खंडणीसाठी उपसरपंचासह नऊ जणांनी हल्ला करुन निर्मिती प्रमुख आणि दिग्दर्शकास बेदम मारहाण केली. याशिवाय शुटींगच्या साहित्यासह कारची तोडफोड केली. याप्रकरणी करवीर पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून ही घटना सोमवारी (दि. ६) रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
संशयित उपसरंपच अमित भिमराव पाटील (वय ३६), दगडु देवाप्पा कांबळे (५९), किरण सुरेश कांबळे (२६), चंद्रकांत मारुती कोपार्डे (३३), अक्षय हंबिराव पाटील (२६), अवधुत हंबिराव पाटील (२२), अमित पंडीत मोहिते (३३), कपील आकाराम माने (२९), रविंद्र आनंदा पाडेकर (३३, सर्व रा. केर्ली, ता. करवीर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
करवीर तालुक्यातील केर्ली येथील कॅप्टन शंकर माने यांच्या बंगल्यामध्ये दि. १३ जून पासून ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मराठी मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. या मालिकेचे प्रसारण लवकरच एका वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.
संशयित उपसरपंचासह नऊ जणांनी मालिकेचे निर्मिती प्रमुख रविंद्र सिध्दु गावडे (रा. कोल्हापूर) यांच्याकडे आमच्या गावात शुटींग करायचे असेल तर महिन्याला तीस हजार रुपये प्रोटेक्शन मनी द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली. मात्र, ही मागणी नाकारल्याने संशयितांनी सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कॅप्टन माने यांच्या बंगल्यात घुसून निर्मीती प्रमुख गावडे आणि दिग्दर्शक गौतम कोळी (रा. मुंबई) यांना धक्काबुक्की करत बेदम मारहाण केली.
यावेळी बंगल्यात शूटींगसाठी असलेल्या साहित्याची तसेच बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या कारची (एम. एच. ०२ डी. एन. ६७२८) दगड विटांनी तोडफोड करुन दहशत माजवली. संशयित मद्यप्राशन करुन असल्याचे समजते. गावडे यांनी याप्रकारणी करवीर पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संशयितांना अटक केली आहे.
कलाकार भयभीत, स्वत:ला कोंडून घेतले
या प्रकारामुळे या शूटींगमध्ये सहभागी असलेल्या कलाकारांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी हा प्रकार सुरु असताना बंगल्यातील एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतले. संशयितांनी या खोलीवर धडका मारल्या, परंतु दार बंद असल्याने त्यांनी आपला मोर्चा खोलीतील इतर साहित्याकडे वळविला. या कलाकारांमध्ये काही महिला कलाकारही होत्या. भयभीत झालेल्या कलाकारांनी या गावातील शूटींग बंद केले आहे.