कोल्हापूर : ऐन हंगामात रेल्वेस्थानकांतील आरक्षण खिडकी बंद, प्रवाशाच्या मोठ्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:53 PM2018-05-21T12:53:41+5:302018-05-21T12:53:41+5:30
ऐन उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना कोल्हापुरातील रेल्वेस्थानकावरील सध्या अस्तित्वात असलेल्या तीन आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी बंद आहे. दोन तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागत असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोल्हापूर : ऐन उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना कोल्हापुरातील रेल्वेस्थानकावरील सध्या अस्तित्वात असलेल्या तीन आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी बंद आहे. दोन तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागत असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथील आरक्षण कक्षातील एक आरक्षण खिडकी बंद असल्याने अन्य दोन खिडक्यांबाहेर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. (छाया : दीपक जाधव)
शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुटी पडल्याने पर्यटनासह गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथील आरक्षण कक्षातील तीन तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी गेल्या महिन्याभरापासून बंद असल्याने, दोन खिडक्यांवर तिकीट काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
बंद खिडकीमुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. तिकीट खिडक्यांवरचाही ताण काही प्रमाणावर कमी करण्यासाठी तिसरी खिडकी सुरू करणे गरजेचे आहे. मात्र अपुरे कर्मचारी व काही कर्मचारी सुटीवर गेल्याने ही खिडकी बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासन सांगत आहे. पुरेसे कर्मचारी नियुक्तीबाबत वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक रेल्वे अधिकारी सांगत आहेत.
रेल्वे तिकिटांच्या आरक्षणासाठी येथे दररोज ४०० ते ४५० आरक्षणाचे अर्ज भरले जातात. त्यामुळे दिवसाकाठी आरक्षणातून मिळणारे उत्पन्न लाखोंच्या घरात आहे. मात्र सध्या दोनच खिडक्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आरक्षण केंद्रावर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
रिक्त पदे तत्काळ भरावी
कोल्हापुरातील आरक्षण कक्षासाठी १२ कर्मचारी पदे मंजूर आहेत. त्यांपैकी सध्या नऊ कर्मचारी कार्यरत आहेत. आणखी तीन कर्मचाऱ्यांची गरज आहे. बंद खिडकीमुळे अन्य दोन खिडक्यांवर नेहमी गर्दी असते. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग होतात. प्रशासनाने तत्काळ रिक्त पदे भरून ही खिडकी सुरू करावी.
- शिवनाथ बियाणी,
सदस्य, पुणे विभागीय सल्लागार समिती