कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील महामंडळाने स्वनिधीतून कर्ज द्यावे, मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:43 PM2018-05-04T13:43:34+5:302018-05-04T13:43:34+5:30
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने बेरोजगारांना स्वनिधीतून कर्ज द्यावे, ५० टक्के कर्ज महामंडळाकडून, ४५ टक्के सबसिडी व केवळ पाच टक्के रक्कम कर्जदाराकडून भरून घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने भवानी मंडपातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने बेरोजगारांना स्वनिधीतून कर्ज द्यावे, ५० टक्के कर्ज महामंडळाकडून, ४५ टक्के सबसिडी व केवळ पाच टक्के रक्कम कर्जदाराकडून भरून घ्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने भवानी मंडपातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या महामंडळाने जाहीर केलेल्या योजनांचा मराठा समाजाला लाभ होत नाही. बिनव्याजी कर्ज ही धूळफेक आहे. अन्य महामंडळे स्वनिधीतून कर्ज योजना राबवीत असताना येथे मात्र बँकांद्वारे कर्ज देण्यात येणार आहे.
अर्जदारांचे प्रस्ताव बँकेकडे पाठविणे व १२ टक्क्यांपर्यंतचे व्याज देणे एवढेच काम महामंडळ करणार आहे. दुसरीकडे, बँका बेरोजगार तरुणांना दाद देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. महामंडळ फक्त दरमहा व्याज लाभार्थ्याच्या नावावर भरणार आहे. त्यामुळे या योजनेचे स्वरूप कर्ज नव्हे, तर व्याज योजना असे झाले आहे.
त्यामुळे शासनाने मूळ मागण्या मान्य करून आर्थिक मागास समाजाला दिलासा द्यावा. यावेळी संजय पाटील, लाला भोसले, प्रथमेश तेली, अभिजित शिंदे, तानाजी मोरे, युवराज शिंदे, अभय पाटील, प्रदीप पाटील, किशोर आयरे, अजय रसाळ, दत्ता लांडगे, जहाँगीर मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.