कोल्हापूर : पैलवानाच्या जीवावर बेतला कुस्तीचा डाव, मानेवर पडल्याने जखमी, उपचारासाठी आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:54 PM2018-04-02T18:54:29+5:302018-04-02T18:54:29+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या मैदानात सोमवारी एक उमदा पैलवान कुस्ती खेळताना मानेवर पडल्याने गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. परिस्थितीने गरीब असलेल्या या पैलवानाच्या उपचारासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन त्याच्या कुटूंबियांनी आणि ग्रामस्थांनी केले आहे.
विक्रम पाटील
करंजफेण/कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या मैदानात सोमवारी एक उमदा पैलवान कुस्ती खेळताना मानेवर पडल्याने गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. परिस्थितीने गरीब असलेल्या या पैलवानाच्या उपचारासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन त्याच्या कुटूंबियांनी आणि ग्रामस्थांनी केले आहे.
कुस्तीची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरचे कुस्तीमध्ये जगात नावलौकिक आहे. त्यामुळे गावोगावी आणि शहरांमध्ये तालमींची संख्याही जास्त आहे, विशेषत: शहरामध्ये तालमी जास्त आहेत. नवीन पैलवान उदयास यावा या हेतूने खेड्यापाड्यातील जत्रा-ऊरसांच्या निमित्ताने कुस्त्यांचे जंगी मैदान भरवले जाते.
रविवारी झालेल्या जोतिबा यात्रेनिम्मित्त पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे गावामध्येही सालाबादप्रमाणे कुस्तांचे मैदान भरवण्यात आले होते. परंतु या भरगच्च भरलेल्या मैदानाला एका दुर्घटनेमुळे गालबोट लागले.
यात्रेनिम्मित झालेल्या या गावातील कुस्ती मैदानातील एका लढतीत ही घटना घडली. पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी येथील निलेश विठ्ठल कंदुरकर हा १९ वर्षीय उमदा पैलवान प्रतिस्पर्ध्याचा एकचक्री डाव परतवून लावण्याच्या प्रयत्नात मानेवर पडला. त्यात त्याच्या मानेवर आतून मोठी गंभीर दुखापत झाली आहे. त्याचे संपूर्ण शरीर विकलांग झाले असून त्याच्यावर आता कोल्हापूरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चाची विवंचना त्यांच्या नातेवाईकांना लागून राहिली आहे. या पैलवानाचा जीव वाचवण्यासाठी आर्थिक सहकार्याचे आवाहन त्यांच्या कुटूंबियांनी केली आहे.
निलेश वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये उच्चशिक्षण घेत असून तेथूनच तात्यासाहेब कोरे कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव करत होता. आजोबांपासून घरात कुस्ती परंपरा लाभल्यामुळे मोठा भाऊ सुहाससह दोघे संकुलात एकत्र राहून सराव करत होते. कुस्तीमध्ये घराण्याचे नाव करण्याचे स्वप्न निलेश आणि सुहास यांच्या डोळयासमोर होते.
वडील विठ्ठल कंदुरकर यांची देखील एकेकाळी पंचक्रोशीत नावारूपास आलेले मल्ल म्हणून ख्याती होती. निलशने ज्युनिअर गटात तालुक्यामध्ये प्रथम तर जिल्हा स्पर्धेमध्ये वेळोवेळी सहभाग नोंदवून सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे खेचून घेऊन आशेचा किरण निर्माण केला होता परंतु या मैदानातील कुस्ती निलेशच्या जीवावरच बेतल्याने कंदुरकर कुटूंबियांवर दु:खाचे आभाळ कोसळले आहे.
विहिरी खुदाई करण्याच्या कामातून घरखर्च
एक एकर शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून वडिलांनी घराण्याची ही पैलवानकी जिवंत ठेवण्याच्या आशेने पोटाला चिमटा देऊन त्यांच्या दोन्ही मुलांना कुस्तीगीर केले. परिस्थितीशी दोन हात करत मोठा भाऊ सुहास आणि निलेश दोघेही सुट्टीमध्ये गावातील व परिसरातील लोकांच्या विहिरी खुदाई करण्याच्या कामातून मिळणाऱ्या उत्पन्नातून घरखर्च आणि कुस्तीसाठी लागणारा खुराक विकत घेत वाटचाल करत होते.
मनमिळाउ आणि नम्र स्वभावामुळे त्यांच्या संपूर्ण कुटूंबावर सर्वांनी लळा लावला आहे. परंतु अचानक हे संकट कोसळल्यामुळे मात्र कंदुरकर कुटूंबिय हवालदिल झाले आहे. पै पाहुण्यांकडून आणि मित्रांकडून मिळणारी मदत जमा करून त्यांनी कोल्हापूरातील एका खासगी रुग्णालयात निलेशवर उपचार सुरु केले आहेत. परंतु शस्त्रक्रियेसाठी व पुढील उपचारासाठी मोठ्या रक्कमेचे आवश्यकता आहे.
घुंगूर गावचे सामाजीक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी पंचवीस हजार रूपयांची मदत देऊन त्यांना आधार दिला आहे.परंतु पुढील उपचारासाठी मोठा मोठा खर्च अपेक्षित असल्याने या उमद्या पैलवानाला पुन्हा मैदानात कुस्तीच्या रूपाने पाहण्यासाठी कुस्तीशौकीनासह दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन कंदुरकर कुटूंबियांनी केले आहे.