कोल्हापूर : शिवडावमधील शाळकरी मुलाला जीवदान, ‘आपलं सीपीआर,चांगलं सीपीआर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:54 PM2018-01-05T14:54:55+5:302018-01-05T14:59:59+5:30
दूचाकी अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होऊन किडनीला (मुत्रपिंड) मोठी दुखापत झालेल्या जिल्हयातील शिवडाव (ता. भुदरगड) मधील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करुन ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
कोल्हापूर : दूचाकी अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होऊन किडनीला (मुत्रपिंड) मोठी दुखापत झालेल्या जिल्हयातील शिवडाव (ता. भुदरगड) मधील शाळकरी मुलावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) ‘अॅब-थेरा’ या नवीन तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीचा वापर करुन ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
निलेश अनिल जाधव (वय १६) असे या मुलाचे नांव आहे. त्याच्या किडनीचे काम पूर्ववत सुरु झाले असून तो पूर्णपणे बरा झाला असल्याची माहिती राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. रामानंद म्हणाले, शिवडाव येथे दूचाकी अपघातात निलेश जाधव हा २२ नोव्हेंबर २०१७ ला जखमी झाला होता. त्याच्या पोटाला मार बसून उजव्या किडनीला मोठी दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. त्याचा रक्तदाबही कमी झाला होता.
त्याची सोनाग्राफी केली असता किडनीभोवती रक्त जमा झाले होते. त्यामुळे त्याला प्रथम कडगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. पण, प्रकृति गंभीर असल्याने त्याला तत्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेमधून सीपीआरमध्ये आणले.
सुमारे चार तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. त्यासाठी चार रक्ताच्या बाटल्या लागल्या. ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. रक्तपोटाच्या मागच्या बाजुला पसरल्याने पोटाची क्षमता कमी झाली होती.
ही किडनी काढून टाकण्यात आली. परंतु, मोठ्या प्रमाणात रक्त गोठवून राहिल्याने पोटाचा आकार व क्षमता कमी झाली होती. शस्त्रक्रियेनंतर पोट टाके घेऊन बंद करणे शक्य नव्हते.म्हणून ‘अॅब-थेरा’ (पोट बंद न करता) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन एका कृत्रिम आवरणाने झाकण्यात आले. तसेच छातीमध्ये नळी टाकून साठलेले रक्त काढले.
निलेशच्या शस्त्रक्रियेनंतर त्याला तीन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले. यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करुन कृत्रिम आवरण काढून टाकून पोट पूर्णपणे बंद केले. दोन दिवसानंतर श्वसनाची नळी व १४ व्या दिवशी छातीची नळी काढली व त्याचे खाणे सुरु झाले आणि तो चालू-फिरु लागला. ४० दिवसानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कौस्तुभ मेंच, डॉ.मधूर जोशी, डॉ. नीता भुरट यांनी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ञ्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. दिपाली, डॉ.राहूल पाटील, डॉ.राऊत यांचे सहकार्य मिळाले.यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, अभ्यागत समितीचे सदस्य सुनील करंबे उपस्थित होते.
यााबाबत निलेशचे मामा उत्तम भिकाजी यादव म्हणाले, निलेशची आई शेतकाम तर वडिल गवंडी काम करतात. तो तांबाळे हायस्कुल नववीमध्ये शिक्षण घेत आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर चांगले उपचार केले.