कोल्हापूर : कठडा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा, अविनाश सुभेदार यांचे आदेश, आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:19 PM2018-01-30T19:19:49+5:302018-01-30T19:31:42+5:30
शिवाजी पुलाच्या तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
कोल्हापूर : शिवाजी पुलाच्या तुटलेल्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) सोमनाथ रसाळ, विभागीय वाहतूक अधिकारी सुनील शिंदे, व्हाईट आर्र्मीचे अशोक रोकडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापुरात २६ जानेवारी रोजी रात्री ११.५० वाजता शिवाजी पुलावरून मिनी बस वाहनचालकाचा ताबा सुटल्याने शिवाजी पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली होती. यात १३ व्यक्तींंचा मृत्यू झाला; तर तीन व्यक्ती जखमी झाल्या.
या अपघातामध्ये शिवाजी पुलाच्या झालेल्या नुकसानीमुळे लोकांच्या व वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाच्या कठड्याची दुरुस्ती तत्काळ करणे आवश्यक आहे.
त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर यांनी या पुलाचे क्षेत्र पुरातत्त्व खात्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत असल्याने आपत्कालीन व्यवस्थापनांतर्गत पुलाच्या संरक्षक कठड्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याबाबत परवानगी देण्याची विनंती जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यानुसार या आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कलम ३४ (ड) मध्ये असलेल्या तात्पुरत्या पूलबांधणीच्या अथवा इतर आवश्यक संरचना तयार करण्याबाबत तरतुदीनुसार शिवाजी पुलाच्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, असे आदेश अविनाश सुभेदार यांनी दिले.