कोल्हापूर : जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाच्या पुरस्कारांचे वितरण, बाळासाठी स्तनपान महत्वाचे :सतीश पत्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 07:33 PM2018-02-26T19:33:41+5:302018-02-26T19:33:41+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी राजर्षी शाहू सभागृहामध्ये त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण व अधिकारी कमर्चाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रसिध्द स्त्रीरोगतजज्ञ डॉ.सतीश बोलत होते.
कोल्हापूर : बाळाच्या निकोप वाढीसाठी स्तनपान हे नैसर्गिक वरदान असून बालकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक मातेच्या दुधात असल्याने याला महत्व दिले जावे अशी अपेक्षा प्रसिध्द स्त्रीरोगतजज्ञ डॉ.सतीश पत्की यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी राजर्षी शाहू सभागृहामध्ये त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण व अधिकारी कमर्चाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी डॉ. पत्की बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, आरोग्य समितीचे सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, शिक्षण सभापती अंबरिष घाटगे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
डॉ. पत्की म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सोयी गावागावापर्यंत पोहोचल्याने दवाखान्यात होणाऱ्या प्रसुती संख्येत वाढ झाली आहे. गरोदर मातेपासून ते प्रसुती झालेल्या मातेपर्यंतच्या सर्व नोंदी उपलब्ध झाल्याने त्यांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता घेणे सोयीचे झाले आहे.
यावेळी शौमिका महाडिक म्हणाल्या, या पुरस्कारांनी गौरवण्यात येणारे दवाखाने, तेथे काम करणारे अधिकारी, कर्मचारी हे अभिनंदनास पात्र आहेत. महिलांकडून आपल्याच आरोग्याची अनेकदा हेळसांड होते. मात्र चांगला संसार करण्यासाठी आपले आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. समतोल आहार, चांगल्या आरोग्य सवयी व वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीचा सर्वांनी अवलंब करावा.
डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्य उत्तम ठेवण्यामध्ये अधिकारी,कमर्चारी यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. कुठलेही काम करीत असतांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कोणतेही काम चांगले होते.
आरोग्य सभापती सर्जेराव पाटील म्हणाले, ग्रामीण जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देऊन त्यांच्या विकासामध्ये योगदान द्यावे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एफ. ए. देसाई यांनी आभार मानले.
यावेळी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ हर्षला वेदक, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद मोरे, आरोग्य समिती सदस्या सुनिता रेडेकर, सुनिता भाटळे, शिल्पा पाटील, पुष्पा रेडेकर, बांधकाम समिती सदस्य हंबीरराव पाटील, उपसंचालक आरोग्य डॉ. पी.पी. धारुरकर उपस्थित होते.