कोल्हापूर : विविधतेतून घडले एकतेचे दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम रंगला; राष्ट्रीय एकात्मता यात्रेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:53 PM2018-01-17T16:53:37+5:302018-01-17T17:03:27+5:30
अरुणाचल प्रदेशाचे पारंपरिक नृत्य, मेघालयाचे देशभक्तिपर पारंपरिक गीत आणि ओवी ते अभंगांद्वारे महाराष्ट्राच्या परंपरा आणि विविधतेतून भारताच्या एकतेचे दर्शन मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे कोल्हापूरकरांना घडले. निमित्त होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) आयोजित राष्ट्रीय एकात्मता यात्रेअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे.
कोल्हापूर : अरुणाचल प्रदेशाचे पारंपरिक नृत्य, मेघालयाचे देशभक्तिपर पारंपरिक गीत आणि ओवी ते अभंगांद्वारे महाराष्ट्राच्या परंपरा आणि विविधतेतून भारताच्या एकतेचे दर्शन मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे कोल्हापूरकरांना घडले. निमित्त होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) आयोजित राष्ट्रीय एकात्मता यात्रेअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे.
‘अभाविप’च्या आंतरराज्य छात्र जीवनदर्शन उपक्रमांतर्गत आयोजित ५३ वी राष्ट्रीय एकात्मता यात्रा गेल्या रविवारी (दि. १४) कोल्हापुरात दाखल झाली. यात सहभागी झालेल्या ईशान्य भारतातील ३० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कोल्हापूर जाणून घेतले. एकात्मता यात्रेअंतर्गत येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
कोल्हापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) राष्ट्रीय एकात्मता यात्रेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यात कोल्हापूरच्या कलाकारांनी वारकरी नृत्यातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडविले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
या कार्यक्रमास अखिल भारतीय प्रादेशिक विश्वविद्यालय कार्यप्रमुख श्रीहरी बोरीकर, अभाविप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रशांत साठे, एकात्मता यात्रेचे समन्वयक जितेंद्र दत्त, विद्यार्थिनी प्रतिनिधी हेबोजेले गामे, विद्यार्थी प्रतिनिधी विदुर गेवाली प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) राष्ट्रीय एकात्मता यात्रेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यात कोल्हापूरच्या कलाकारांनी गोंधळनृत्य सादर करून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडविले. (छाया : आदित्य वेल्हाळ)
एकात्मता यात्रेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रमुख उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. यात प्रारंभी अरुणाचल प्रदेशाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर केले. मेघालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी देशासाठी एकत्र या, असा संदेश गायनातून दिला.
यानंतर कोल्हापूरच्या कलाकारांनी ओवी, गोंधळ, शेतकरीनृत्य, धनगरी, कोळीनृत्य, वारकरीनृत्यातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडविले. या कार्यक्रमास एकात्मा यात्रेच्या स्वागत समितीचे अध्यक्ष विद्यानंद देवधर, सचिव नरेंद्र चांदसरकर, क्रांती शेवाळे, अनंत खासबारदार, राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, आदी उपस्थित होते.
ईशान्य भारतातील युवक-युवतींना संधी द्यावी
या कार्यक्रमात प्रा. साठे म्हणाले, समाजातील प्रत्येक व्यक्ती कार्यरत राहायला हवी. हा ‘अभाविप’चा उद्देश आहे. त्यामुळे तंत्रशिक्षण, वैद्यकीय, कृषी शिक्षण क्षेत्रांत अभाविप कार्यरत आहे.
श्रीहरी बोरीकर म्हणाले, आपल्या देशातील विविधतेमधील एकता आजही कायम आहे. ईशान्य भारतातील नागरिकांना आपणा सर्व देशवासीयांचे प्रेम आणि पाठबळाची गरज आहे. येथील युवक-युवतींना रोजगार, शिक्षणाबाबतच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.