कोल्हापूर : पावसामुळे एस.टी.चे ११ लाखांचे उत्पन्न बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 05:41 PM2018-07-18T17:41:42+5:302018-07-18T17:45:42+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुराचे पाणी आल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने काही मार्गांवरील फेऱ्या रद्द केल्याने सुमारे ११ लाख ३९८ रुपयांचे उत्पन्न बुडले आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. एस. टी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असली तरी प्रवाशांना यांचा आर्थिक फटका मात्र बसत आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर रजपूतवाडीजवळ पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद केला आहे. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक पुणे-बंगलोर महामार्गावरून बोरपाडळेमार्गे वळविण्यात आली आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर टेकवाडीजवळ पाणी आल्याने कोकणात जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. ही वाहतूक राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे. कळे येथे पाणी आल्याने बाजारभोगावला जाणारी वाहतूक बंद आहे. भडगाव पुलावर पाणी आल्याने गडहिंग्लजमधून नेसरी, चंदगडला जाणारी वाहतूक आजरामार्गे वळविली आहे.
३९ हजार किलोमीटर रद्द
कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा, आजरा या बारा आगारांतील दोन दिवसांत १ हजार १७ गाड्यांच्या फेऱ्या पावसामुळे रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एकूण ३९ हजार ५०५ किलोमीटरचा प्रवास रद्द झाल्याने सुमारे ११ लाख ४८८ रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.