कोल्हापूर : देशातील घटनात्मक संस्थांचे अस्तित्व धोक्यात : अजित पवार यांची बोचरी टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 05:39 PM2018-10-27T17:39:47+5:302018-10-27T17:58:34+5:30
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून सर्वोच्च न्यायालय, निती आयोग, आरबीआय, आयबी, सीबीआय यासारख्या देशातील सर्वोच्च असलेल्या घटनात्मक संस्थांचे अस्तित्व धोक्यात असल्याची बोचरी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात बोलताना केली.
कोल्हापूर : नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून सर्वोच्च न्यायालय, निती आयोग, आरबीआय, आयबी, सीबीआय यासारख्या देशातील सर्वोच्च असलेल्या घटनात्मक संस्थांचे अस्तित्व धोक्यात असल्याची बोचरी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी शनिवारी कोल्हापुरात बोलताना केली. देशाला या अभूतपूर्व संकटातून बाहेर काढायचे असेल तर कें द्रातील आणि राज्यातील भाजप सरकारला गाडले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश तसेच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस आयोजित एल्गार परिषदेत अजित पवार बोलत होते. मार्केट यार्ड परिसरात झालेल्या या परिषदेला जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून तरुण मोठ्या प्रमाणावर आले होते.
निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून सर्वसामान्य जनतेने भाजपला २०१४ च्या निवडणुकीत विजयी केले; परंतु साडेचार वर्षांतच देशातील सर्व घटकांचा भ्रमनिरास झाला. तरुणांना, सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, व्यापाऱ्यांना, महिलांना भाजप सरकारने फसविले. एवढेच नाही तर सत्तेची मस्ती आणि धुंदी चढल्यामुळे वाटेल ते बोलून राज्यकर्ते सामान्य माणसांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, असा आरोप पवार यांनी केला.
सीबीआय संस्थेवर ‘आयबी’कडून पाळत ठेवली जात असेल आणि सीबीआयच्या संचालकाला रात्री दोन वाजता व्हॉट्स अॅपवरून सक्तीच्या रजेवर पाठविले जात असेल तर या देशाला वाचविणार कोण? असा सवाल करीत या सगळ्या गोष्टी हुकुमशाही पद्धतीच्या आणि धोकादायक असल्याचे पवार म्हणाले.
आपल्या एक तासाचा घणाघाती भाषणात त्यांनी भाजप सरकारची आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेची अक्षरश: टर उडविली. पेट्रोल दरवाढीसह सर्वच क्षेत्रांतील महागाई, स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र , वर्षाला दोन कोटी युवकांना नोकऱ्या, जीएसटी, नोटाबंदी, शिवस्मारक, इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारक, सहकारी व खासगी बॅँकांचे अस्तित्व या सगळ्यांबाबत सरकारने फसवणूक केली.
शिवसेना बावचाळलीय
शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे त्यांनाही आणि त्यांच्या नेत्यालाही गेल्या साडेचार वर्षात कळालेले नाही. शिवसेनेची अवस्था बावचाळल्यासारखी, गोंधळल्यासारखी झाली आहे. सत्तेत असलेल्यांनी निर्णय घ्यायचे असतात; पण शिवसेना नुसत्या मागण्या करीत आहे, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.
राफेलचं भूतच मोदींना गाडेल : मुश्रीफ
बोफोर्सच्या भुताने राजीव गांधींना सोडले नाही. आता राफेलचे भूत नरेंद्र मोदींना सोडणार नाही. राफेलचे भूतच मोदी यांना गाडल्याशिवाय राहणार नाही, ही माझी भविष्यवाणी आहे, असे आमदार हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले.
मोदी म्हणजे हुकुमशहा : शिंदे
राष्ट्रपतींच्या बहुमानापासून सर्वोच्च स्वायत्त संस्थांचे अस्तित्व नरेंद्र मोदींनी धोक्यात आणले. मोदींच्या रूपाने देशात हुकुमशहा निर्माण झाला आहे. त्यांच्या कारभारामुळे लोकशाही धोक्यात आली, असे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.
नविद मुश्रीफ यांनी स्वागत केले. प्रदेश युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्रामसिंह कोते-पाटील यांनी प्रास्ताविकात ‘वन बूथ-फिफ्टीन यूथ’ची योजना सांगितली. त्यानंतर युवक महिला प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भैय्या माने यांची भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, के. पी. पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास, राजेंद्र पाटील-यड्रावकर, मानसिंगराव गायकवाड, महेंद्र चव्हाण, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील उपस्थित होते.