Ganesh Chaturthi 2018 : कोल्हापूर गणेशोत्सव : राजारामपुरीत अवतरले ‘संत बाळूमामा’, ‘इंद्रमहल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 06:00 PM2018-09-19T18:00:49+5:302018-09-19T18:10:08+5:30
गणेशोत्सव काळात आपली वेगळी ओळख जपणाऱ्या राजारामपुरीने यंदाही तांत्रिक देखावे,आकर्षक महलसह सजीव देखाव्यांनी आपली ओळख कायम ठेवली आहे. येथील सर्व देखावे सुरू झाल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी होत आहे.
कोल्हापूर : गणेशोत्सव काळात आपली वेगळी ओळख जपणाऱ्या राजारामपुरीने यंदाही तांत्रिक देखावे,आकर्षक महलसह सजीव देखाव्यांनी आपली ओळख कायम ठेवली आहे. येथील सर्व देखावे सुरू झाल्याने नागरिकांची देखावे पाहण्यासाठी या परिसरात मोठी गर्दी होत आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात राजारामपुरी दहावी गल्ली येथील इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने ‘राजारामपुरीचा राजा’ या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्याचसोबत ३० बाय ८० फूट असा भव्य, आकर्षक इंद्रमहाल उभा केला आहे. अंतर्गत सजावट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सहाव्या गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळातर्फे या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ‘दहीहंडी’ हा तांत्रिक देखावा; तर नऊ नंबर शाळेजवळील ‘आदमापूरचे संत बाळूमामा’ यांचा सजीव देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
शिवाजी विद्यापीठ रोड येथील शाहूराजे मित्रमंडळाची ‘कोल्हापूर दक्षिणचा राजा’ २१ फुटी आकर्षक दगडूशेठ गणपती पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे. अकरावी गल्ली येथील युवक मित्रमंडळाच्या ‘चांद्रयान मोहीम’ तांत्रिक देखाव्याच्या माध्यमातून अवकाश संशोधनाची परिपूर्ण माहिती दिली जाते. सातव्या गल्लीतील न्यू फ्रेंड्स मित्रमंडळाचा ‘सायकल चालवा’ हा संदेश देणारा देखावा आहे; तर ‘गडकोट वाचवा’ हा संदेश देणारा देखावा फ्रेंड्स तरुण मंडळाने यंदा साकारला आहे.
कोल्हापुरातील राजारामपुरी दहावी गल्ली येथील इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने आकर्षक इंद्रमहल उभा केला आहे. (छाया : नसीर अत्तार)
सहाव्या गल्लीतील भगतसिंग तरुण मंडळाची चिंतामणी रूपातील भव्य २१ फुटी आकर्षक गणेशमूर्ती आहे. हिंदवी स्वराज्य मित्रमंडळाचा ‘एक मराठा - लाख मराठा’ सजीव देखावा, पाचव्या गल्लीतील विवेकानंद मित्रमंडळाने सजीव देखावा साकारला आहे. चौथ्या गल्लीतील जय मराठा तरुण मंडळाने नागपंचमी हा तांत्रिक देखावा आहे; तर तिसरी गल्लीतील एकता मित्रमंडळ प्रणित महाडिक ग्रुपचा इच्छापूर्ती महादेव तांत्रिक देखावा व मंडपातच पंजाची प्रतिष्ठापना केली आहे. तिसºया गल्लीतील राजारामपुरी स्पोर्टस्ने जोधपूरमधील तारा मंदिर साकारण्यात आले आहे.