कोल्हापूर : पानसरे खूनप्रकरणाच्या तपासाबाबत सरकार गंभीर नाही : एन. डी. पाटील यांचा आरोप, तपासासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 06:24 PM2017-12-21T18:24:22+5:302017-12-21T18:32:13+5:30
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला २ वर्षे १० महिने झाले तरी संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोलकर यांचा शोध लागलेला नाही. त्यांची संपत्ती जप्त केलेली नाही, तसेच त्यांच्या छायाचित्रांचेही सार्वत्रिकरण केलेले नाही, ही बाब अतिशय वेदनादायी आहे. यावरून हे सरकार व पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे, असा आरोप कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी गुरुवारी येथे केला.
कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला २ वर्षे १० महिने झाले तरी संशयित आरोपी विनय पवार व सारंग अकोलकर यांचा शोध लागलेला नाही. त्यांची संपत्ती जप्त केलेली नाही, तसेच त्यांच्या छायाचित्रांचेही सार्वत्रिकरण केलेले नाही, ही बाब अतिशय वेदनादायी आहे. यावरून हे सरकार व पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसत आहे, असा आरोप कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांनी गुरुवारी येथे केला.
पानसरे खूनप्रकरणातील तपासाबाबत पोलीस व शासनाच्या कार्यवाहीबद्दल विचारणा करण्यासाठी प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदन सादर करत सविस्तर चर्चा केली. यावेळी पोलीस अधीक्षक संजय मोहिते उपस्थित होते.
प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, पानसरे खुनाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथका(एसआयटी)तील तपास अधिकारी सुहेल शर्मा यांची पदोन्नतीवर बदली झाली; परंतु अद्याप त्यांच्या जागी नव्या अप्पर पोलीस अधीक्षकांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे याचा तात्पुरता पदभार हा इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांच्याकडे आहे. या तपासासाठी पूर्णवेळ अधिकारी नसल्याने योग्य पद्धतीने तपास होताना दिसत नाही.
फरारी आरोपींच्या फोटोंचे सार्वत्रिकरण पोलिसांकडून झालेले नाही. त्यामुळे सरकारही याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. त्यासाठी पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या ‘एसआयटी’च्या तपास अधिकाºयांची त्वरित नियुक्ती करावी. या तपासावर पूर्णवेळ काम करणारा तपास अधिकारी नियुक्त करावा व फरारी आरोपींच्या शोधमोहिमेसाठी एक विशेष पथक त्वरित नियुक्त करावे, या मागण्यांबाबत तातडीने शासनाला कळवावे. कारण सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्ये यावर चर्चा होईल.
पोलीस अधीक्षक मोहिते म्हणाले, या तपासासाठी पूर्णवेळ अधिकारी असावा, असे आपलेही मत आहे. त्यामुळे मी व जिल्हाधिकारी या मागण्यांबाबत आजच सरकारला कळवू. यावेळी दिलीप पवार, प्रा. टी. एस. पाटील, मेघा पानसरे, चंद्रकांत यादव, संभाजी जगदाळे, नामदेव गावडे, रघुनाथ कांबळे, धनाजीराव जाधव, सतीशचंद्र कांबळे, एस. बी. पाटील, सीमा पाटील, गीता हसूरकर, एम. बी. पडवळे, जमीर शेख, आप्पा कुलकर्णी आदी उपस्थित होते.