कोल्हापूर : पानसरे, दाभोलकर यांच्या मारेकऱ्याना सरकार पाठीशी घालतंय : उमा पानसरे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 05:35 PM2018-04-20T17:35:45+5:302018-04-20T17:35:45+5:30
परिवर्तनवादी विचारांनी काम करणाऱ्या अॅड. गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्याना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप उमा पानसरे यांनी शुक्रवारी येथे केला. विचारवंतांच्या हत्यांच्या तपासात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; यासह शेतकऱ्याना दीडपट हमीभाव द्यावा, कर्जमाफी करावी, विनाअट पेन्शन मिळावी, आदी विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकार खाली खेचण्याचे आवाहन करण्यात आले.
कोल्हापूर : परिवर्तनवादी विचारांनी काम करणाऱ्या अॅड. गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्याना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप उमा पानसरे यांनी शुक्रवारी येथे केला. विचारवंतांच्या हत्यांच्या तपासात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; यासह शेतकऱ्याना दीडपट हमीभाव द्यावा, कर्जमाफी करावी, विनाअट पेन्शन मिळावी, आदी विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकार खाली खेचण्याचे आवाहन करण्यात आले.
टाउन हॉल उद्यान येथून दुपारी साडेबाराच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये रणरणत्या उन्हातही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील भाकपचे कार्यकर्ते हातात लाल झेंडे आणि सरकारविरोधातील फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. मोर्चा शिवाजी चौक, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी त्याचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी उमा पानसरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. हे सरकार पानसरे, दाभोलकर या विचारवंतांच्या मारेकऱ्याना पाठीशी घालत आहे, असे सांगून हत्यांच्या तपासामध्ये लक्ष न घालणाऱ्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा नाही; कारण हे भाजप सरकार भ्रष्ट असून त्यांना बुद्धिवादी व विचारवंत लोकच नको आहेत. त्यांना योगी व भ्रष्टाचारीच लोक पाहिजेत. त्यामुळे हे सरकार घालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून, त्याला यश येईल, असे उमा पानसरे यांनी सांगितले.
दरम्यान, उमा पानसरे, नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, लता भिसे, प्रवीण मस्तूद, रमेश सहस्रबुद्धे, शाम चिंचणे, आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यामध्ये गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश, कलबुर्गी अशा विचारवंतांच्या मारेकऱ्याना सूत्रधारासह पकडून शिक्षा करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.
वाढती महागाई, शिक्षणाचे खासगीकरण व धार्मिकीकरण रद्द करून १३१४ शाळा बंदचा निर्णय मागे घ्यावा, शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा, कामगारांना किमान समान वेतन, महिला, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांच्यावरील वाढते अत्याचार थांबवावेत, आरामबस व बसचालकांना बेकायदेशीरपणे अडवून संविधानाची व न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनात दत्ता मोरे, रघुनाथ कांबळे, गिरीश फोंडे, बी. एल. बरगे, दिनकर सूर्यवंशी, स्वाती क्षीरसागर, शिवाजी माळी, प्रशांत आंबी, दिलदार मुजावर, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.