कोल्हापूर : झीप क्वाईनचा प्रारंभ राहुल रॉयच्या हस्ते, पोलीस तपासात निष्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:59 AM2018-05-05T11:59:31+5:302018-05-05T11:59:31+5:30
झीप क्वाईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचा प्रारंभ मुंबईत सिने अभिनेता राहुल रॉय याच्या हस्ते करण्यात आल्याची कबुली तिघा भामट्यांनी दिली आहे. या कार्यक्रमास उद्योगपती, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांना निमंत्रित केले होते.
कोल्हापूर : झीप क्वाईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या कंपनीचा प्रारंभ मुंबईत सिने अभिनेता राहुल रॉय याच्या हस्ते करण्यात आल्याची कबुली तिघा भामट्यांनी दिली आहे. या कार्यक्रमास उद्योगपती, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांना निमंत्रित केले होते.
दरम्यान, संशयित राजेंद्र नेर्लेकर, त्याचा भाऊ अनिल व संजय कुंभार या तिघा भामट्यांच्या विरोधात आतापर्यंत चौदा तक्रारी दाखल झाल्या असून फसवणुकीचा आकडा दोन कोटींपर्यंत गेला आहे. या भामट्यांनी सुमारे दीडशे कोटींची फसवणूक केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बालाजी गणगे (रा. पुणे) याचा कसोशीने शोध सुरू आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.
चार दिवसांपूर्वी झीप क्वाईन क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश कोल्हापूर पोलिसांनी केला. या प्रकरणी संशयित राजेंद्र नेर्लेकर, त्याचा भाऊ अनिल व संजय तमन्ना कुंभार हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या झीप क्वाईनच्या प्रारंभ कार्यक्रमास अभिनेता राहुल रॉयला निमंत्रित केले होते, अशी कबुली त्यांनी दिली. त्यांचा मुख्य सूत्रधार संशयित बालाजी गणगे आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या संगणकाचा पासवर्ड गणगे याला माहीत आहे. तो शोधून काढण्यासाठी शुक्रवारी सायबर तज्ज्ञांनी मेहनत घेतली. मात्र तो उघडता आला नाही. राजेंद्र नेर्लेकर याची पत्नी पद्मा, मुलगा बालाजी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी त्यांना अटक दाखविण्याची शक्यता आहे.
राजेंद्र नेर्लेकर याची आलिशान कार दुरुस्तीच्या कामानिमित्त पुणे येथील गॅरेजमध्ये आहे. येथील गॅरेजच्या व्यवस्थापनाशी कार पोलिसांच्या ताब्यात द्यावी, असा पत्रव्यवहार केला आहे. कुंभार याने आलिशान कार दुसऱ्याला विकली आहे. ती फसवणुकीच्या गुन्ह्यातील पैशातून खरेदी केली आहे काय, याची चौकशी करून तसे आढळल्यास कार जप्त केली जाणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.