कोल्हापूर : आरे केले, तर कारेने उत्तर देऊ : चंद्रदीप नरके, दडपण झुगारून सभेला या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:10 AM2018-09-25T11:10:17+5:302018-09-25T11:20:03+5:30
सत्तारूढ गटाच्या नेत्यांची गर्वाची भाषा सुरू झाली असून, आरे केले तर कारेने उत्तर दिले जाईल, असा इशारा देत मल्टिस्टेटला विरोध केला म्हणून ‘गोकुळ’ने वासाचे दूध काढले, तर संचालकांच्या गाड्या आडवा, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
कोल्हापूर : सत्तारूढ गटाच्या नेत्यांची गर्वाची भाषा सुरू झाली असून, आरे केले तर कारेने उत्तर दिले जाईल, असा इशारा देत मल्टिस्टेटला विरोध केला म्हणून ‘गोकुळ’ने वासाचे दूध काढले, तर संचालकांच्या गाड्या आडवा, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
मल्टिस्टेटबाबत गोकुळ बचाव कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार नरके म्हणाले, संकलन वाढवायच्या अगोदर विस्तारीकरण करणे हे बेकायदेशीर असून गेल्या निवडणुकीत ५०-६० मतांचा फरक राहिल्याने हेतुपुरस्सर मल्टिस्टेटचा विषय आणला आहे.
‘अमूल’ व ‘गोकुळ’च्या विश्वस्तांमध्ये जमीनअस्मानचा फरक आहे. साखर व्यवसायात आम्ही कितीही अडचणी आल्या तरी एफआपीप्रमाणे दर देतो, पण सरकारने गाय दूध २७ रुपयांनी खरेदी करण्याचा अध्यादेश काढूनही २३ ते २५ रुपयांनी खरेदी केली जाते. मग शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर आपण बाहेर पडू, असे म्हणणाऱ्यांना हा फरक दिसत नाही का? असा सवाल नरके यांनी केला.
साखर कारखान्यांचे संचालक शेतकऱ्यांच्या दडपणाखाली राहतात, पण ‘गोकुळ’चे उत्पादक संचालकांच्या दडपणाखाली असल्याचे चित्र आहे, हे दडपण झुगारून सभेला उपस्थित रहा, असे आवाहन नरके यांनी केले.
संपतराव पवार म्हणाले, कष्टकऱ्यांच्या जिवावर ‘गोकुळ’ उभारले आहे, पण त्यांच्या घरात कोणी पाणी ओतण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते सहन करणार नाही. विरेंद्र मंडलिक, रणजितसिंह पाटील, प्रा. बाबासाहेब शिंदे, बाबासाहेब देवकर यांनी मनोगत व्यक्त केले.
शिवाजी परूळेकर, अजित नरके, महेश नरसिंगराव पाटील, सदाशिव चरापले, अभिषेक बोंद्रे, उमेश आपटे, बाळासाहेब कुपेकर, कर्णसिंह गायकवाड, सत्यजित जाधव, दौलतराव जाधव, सचिन घोरपडे, आदी उपस्थित होते. प्रदीप पाटील यांनी आभार मानले.
तर बापू आणि मी लढाई सुरूच ठेवू
महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी काहीजण पुढाकार घेणार आहेत. हसन मुुश्रीफ यांनाही भेटायला येतील, तुम्ही जरी यातून माघार घेतली तरी संपतबापू आणि आपण लढाई सुरूच ठेवू, असे नरके यांनी सांगितले.
महाडिक मात्र तोफेला
पी. एन. पाटील हे सतेज पाटील यांच्यावर बोलत नाहीत. ते हुशार आहेत, महादेवराव महाडिक यांना तोफेला देऊन आपण बाजूला राहतात, असा टोला नरके यांनी लगावला.
रविवारी सकाळी आठ वाजता या
सभेदिवशी, रविवारी सकाळी आठ वाजता वॉटर पार्क येथे हजर राहायचे आणि नऊच्या आत सभा मंडपात उपस्थित राहण्याची सूचना सतेज पाटील यांनी सभासदांना केली.