कोल्हापूर विधि सेवा प्राधिकरण राज्यात भारी
By admin | Published: October 20, 2016 01:20 AM2016-10-20T01:20:45+5:302016-10-20T01:20:45+5:30
दिल्लीत ९ नोव्हेंबरला होणार गौरव
कोल्हापूर : कोल्हापूर विधि व सेवा प्राधिकरणाने केलेल्या कार्याची दखल घेत उच्च न्यायालयाने महाराष्ट्रामधील सर्वाेत्कृष्ट प्राधिकरण म्हणून कोल्हापूरच्या प्राधिकरणाची निवड केली आहे. ९ नोव्हेंबर हा ‘विधि सेवा दिन’ असून, या दिवशी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात कोल्हापूरच्या प्राधिकरणाचा गौरव करण्यात येणार आहे. प्राधिकरणाचे सदस्य सचिव उमेशचंद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
समाजातील उपेक्षित, आर्थिकदृष्ट्या कमी ऐपत असलेल्या आणि अशिक्षित, अपंग आणि सर्वसामान्य अशांसाठी न्याय मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी कोल्हापूर विधि व सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार २०१५ मध्ये अवैध मानवी व्यापाराचे बळी आणि व्यावसायिक लैंगिक शोषण या विषयांवरील परिसंवाद, वारांगणा, तृतीयपंथींना शिधापत्रिका देणे, आधारकार्ड देणे यासाठी प्रयत्न असे उपक्रम राबविले.
लहान मुले, लैंगिक अत्याचार, महिला सबलीकरण, घरगुती हिंसाचार याबाबत प्रत्यक्ष मदत, परिसंवाद, चर्चासत्र, संमेलन, प्रदर्शनातून काम केले. त्याची दखल घेत ‘राज्यातील सर्वाेत्कृष्ट प्राधिकरण’ म्हणून निवड करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला अॅड. व्ही. व्ही. पाटील-येळवडेकर, अॅड. शशिकला पाटील, अॅड. इरफान पटेल, अॅड. सारिका तोडकर, अॅड. योगिता हरणे, अॅड. शुभांगी निंबाळकर, अॅड. विजय ताटे देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)