प्रतिष्ठेची कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा ५ डिसेंबरपासून, विजेत्यास दोन लाखाचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 05:42 PM2017-11-18T17:42:15+5:302017-11-18T17:52:28+5:30
गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेली प्रतिष्ठेची कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने भरविली जात आहे. दि. ५ ते ८ डिसेंबर दरम्यान येथील ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर ही स्पर्धा होत असून, विशेष म्हणजे त्याच्या जोडीला महिला कुस्ती स्पर्धा आणि हिंदकेसरी कमलजितसिंह पंजाब विरुद्ध मोतीबाग तालमीचा बालारफीक शेख यांच्यातील बेमुदत निकाली कुस्तीचेही आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेली प्रतिष्ठेची कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा यावर्षीपासून पुन्हा नव्या जोमाने भरविली जात आहे. दि. ५ ते ८ डिसेंबर दरम्यान येथील ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानावर ही स्पर्धा होत असून, विशेष म्हणजे त्याच्या जोडीला महिला कुस्ती स्पर्धा आणि हिंदकेसरी कमलजितसिंह पंजाब विरुद्ध मोतीबाग तालमीचा बालारफीक शेख यांच्यातील बेमुदत निकाली कुस्तीचेही आयोजन करण्यात आले आहे.
रोख रकमेचा वर्षाव करणाऱ्या या महापौर चषक कुस्ती स्पर्धेत जिंकणाऱ्या मल्लांना अनुक्रमे दोन लाख, एक लाख व पन्नास हजार रुपये बक्षिसादाखल मिळणार आहेत. महापौर चषकाच्या मानकरी मल्लाला चांदीची गदा, प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. महापौर चषक गटात खेळण्यासाठी ८५ किलोच्यावरील मल्लांना प्रवेश देण्यात येणार आहे.
महापौर हसिना फरास व राष्ट्रीय तालीम संघाचे पदाधिकारी अॅड. महादेवराव आडगुळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली. कुस्तीमध्ये कोल्हापूरचे नाव अव्वलस्थानी आहे. त्यामुळे महानगरपालिकेने ‘कुस्ती पंढरी’ म्हणून असलेला नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न केला; परंतु गेल्या दहा वर्षांपासून ही स्पर्धा बंद होती, ती आता सुरू होत असल्याचा आपणाला आनंद होत असल्याचे महापौरांनी सांगितले.
महापौर चषक कुस्ती स्पर्धा ही कोेल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ, कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने होत असून, महापौर चषकाची प्रथम क्रमांकाची कुस्ती पंधरा मिनिटांची होईल. त्यामध्ये बरोबर राहिली तर पाच मिनिटे वाढवून दिली जातील. त्यानंतरही बरोबरीत राहिली तर पुढील वेळेत जो मल्ल पहिला गुण मिळवेल त्याला विजेता म्हणून घोषित करण्यात येईल, असे अॅड. आडगुळे यांनी सांगितले.
यंदा प्रथमच महिला कुस्तीगिरांना सुद्धा स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येत आहे. महिलांसाठी ५५ किलो, ६० किलो व ६० किलोंच्यावरील खुला अशा तीन गटांत ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. महिला महापौर कुस्तीत ६० किलोंच्या वरील महिला कुस्तीगिरांना प्रवेश दिला जाईल.
या स्पर्धेसोबतच हिंदकेसरी मल्ला कमलजितसिंह पंजाब विरुद्ध न्यू मोतीबाग तालमीचा मल्ल भगवंत केसरी बालारफीक शेख यांच्यात बेमुदत कुस्ती खेळविली जाणार आहे. या दोन्ही मल्लांना दोन लाख ८५ हजारांचे मानधन विभागून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेस उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, गटनेते शारंगधर देशमुख, सुनील पाटील, महान भारत केसरी दादू चौगुले, हिंद केसरी विनोद चौगुले, संभाजी वरुटे, नामदेव मोळे, आदिल फरास उपस्थित होते.
वजन गट आणि बक्षिसे -
-महापौर केसरी - ८६ किलोंच्यावरील गट - विजेता दोन लाख
- उपविजेता एक लाख, तृतीय ५० हजार रुपये
- ८५ किलो - ३१ हजार, २० हजार व १५ हजार रुपये.
- ७४ किलो - २० हजार, १५ हजार व १० हजार रुपये.
- ६५ किलो - १५ हजार, १० हजार व ७ हजार रुपये.
- ६१ किलो - १२ हजार, ८ हजार, ५ हजार रुपये.
- ५७ किलो - १० हजार, ७ हजार, ५ हजार रुपये.
महिला गट -
- महापौर केसरी (६० किलोंच्यावरील गट)- विजेता ५० हजार,
- उपविजेता २५ हजार, तृतीय १५ हजार रुपये.
- ६० किलो वजन गट - १५ हजार, ७ हजार, ५ हजार रुपये.
- ५५ किलो वजनगट - १० हजार, ५ हजार , ३ हजार रुपये.