कोल्हापूर : मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:21 PM2018-09-17T12:21:51+5:302018-09-17T12:26:11+5:30
सदर बझार येथील नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया नराधमास तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सदर बझार येथील ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी रविवारी सायंकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. संशयित भूकंप उर्फ बंड्या आनंदा दाभाडे (रा. सदर बझार) असे त्याचे नाव आहे.
कोल्हापूर : सदर बझार येथील नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तत्काळ अटक करा, या मागणीसाठी सदर बझार येथील ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. संशयित भूकंप उर्फ बंड्या आनंदा दाभाडे (रा. सदर बझार) असे त्याचे नाव आहे.
भूकंप दाभाडे (आरोपी)
अधिक माहिती अशी, संशयित भूकंप दाभाडे हा पीडित मुलीच्या शेजारीच राहतो. शनिवारी (दि. १५) सकाळी दहा ते बाराच्या सुमारास मुलगी घरी एकटी असताना संशयिताने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची माहिती पीडितेने आजीला दिली. आजीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित दाभाडे याच्याविरोधात फिर्याद दिली.
मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे सदर बझार परिसरातील नागरिकांतून संतप्त भावना उमटल्या. गुन्हा दाखल होऊन बारा तास उलटले तरी आरोपीला अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ येथील सुमारे ५०० पेक्षा जास्त नागरिकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. मोर्चामध्ये महिलांची संख्या जास्त होती. प्रवेशद्वारावरील पोलिसांचे कडे तोडून महिला पोलीस ठाण्यात घुसल्या. त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना ‘आरोपीला अद्याप अटक का झाली नाही?’ असा जाब विचारला.
कोल्हापुरातील सदर बझार येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तत्काळ अटक करा, या मागणीसाठी महिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यावर काढलेला मोर्चा. (छाया : दीपक जाधव)
डॉ. अमृतकर यांनी नागरिकांची समजूत काढत ‘संशयितावर गुन्हा दाखल आहे. पोलीस त्याच्या घरी गेले होते; परंतु तो पसार झाला आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत. त्याला अटक करणारच,’ असे सांगितले. त्यावर महिला शांत होऊन माघारी परतल्या.
अचानक महिला पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर आल्यामुळे दाभोळकर कॉर्नर चौकातून व्हीनस कॉर्नर चौकाकडे जाणारी वाहने थांबून राहिल्याने कोंडी झाली. महिला आत घुसल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनीही महिलांना विश्वासात घेत संशयिताला अटक करण्याची ग्वाही दिली.