कोल्हापूर : बॅकफुटवर नाही पण अपेक्षा मात्र वाढल्या : पूनम महाजन यांची कबुली, शिवसेनेबरोबर युतीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 03:33 PM2018-02-22T15:33:26+5:302018-02-22T15:45:09+5:30
केंद्र व राज्य सरकारबध्दल ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या पाहता लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे मान्यच परंतू सरकार किंवा पक्ष म्हणूनही आम्ही बॅकफूटवर गेलेलो नाही असे भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेबरोबरचे भांडण हे घरातल्या भांडणासारखे आहे, आणि युती दोन्ही बाजूने तोडली गेलेली नाही असे सांगत त्यांनी या पक्षाशी नव्याने युतीचे संकेत दिले.
कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारबध्दल ज्या प्रतिक्रिया येत आहेत, त्या पाहता लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे मान्यच परंतू सरकार किंवा पक्ष म्हणूनही आम्ही बॅकफूटवर गेलेलो नाही असे भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेबरोबरचे भांडण हे घरातल्या भांडणासारखे आहे, आणि युती दोन्ही बाजूने तोडली गेलेली नाही असे सांगत त्यांनी या पक्षाशी नव्याने युतीचे संकेत दिले.
श्रीमती महाजन यांचा गुरुवारपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरु झाला. त्यानिमित्त सकाळी येथे त्यांची जल्लोषात रॅली काढण्यात आली व त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदीं पंतप्रधान म्हणून चांगले काम करत असले तरी त्यांच्याकडे चांगली टीम नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केले होते.
त्याबध्दल पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या,‘ पवार म्हणतात तसे कांही नाही. भाजप व सरकारमध्येही उत्तम टीमवर्क आहे.शिवाय आमचा कॅप्टनच इतकी धुवाँधार बॅटींग करत आहे. भारत जेव्हा मॅच जिंकतो तेव्हा विराटच्या खेळाचीच चर्चा होते. त्यामुळे पवार यांनी आमच्या टीमची काळजी करू नये. काँग्रेस आघाडीच्या काळात बरेचसे निर्णय रिमोट कँट्रोलने होत होते.’
त्या म्हणाल्या,‘ पक्ष मोठा व्हायला लागला की खटके उडतात तसेच शिवसेनेसोबत झाले आहे. परंतू तो पक्ष अजूनही सत्तेत आहे. व जरी शिवसेनेने स्वबळावर लढायची घोषणा केली असली तरी हा निर्णय एकाबाजूने झाला आहे. आमचा त्यांच्याशी संवाद सुरु आहे व मला वाटते त्यातून कांहीतरी मार्ग निघेल.
यावेळी आमदार योगेश टिळक, मधुकेश्र्वर देसाई, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, राहूल चिकोडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदिप देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकसभा हेच माझे लक्ष्य
मुंबईतून लोकसभा निवडणूक पुन्हा चांगल्या मतांनी कशी निवडून येवू हाच माझा तरी सध्याचा महत्वाचा प्राधान्यक्रम आहे असे त्यांनी स्पष्ट केले. महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्हांला कितपत संधी या प्रश्र्नांवर त्यांनी छे..कांहीतरी काय प्रश्र्न विचारताय असे उत्तर दिले.