कोल्हापूर : भाजीपाल्याच्या दरात वाढ, आवक घटल्याने कांदाही वधारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:41 PM2018-07-02T12:41:19+5:302018-07-02T12:43:51+5:30
पावसामुळे भाजीपाल्याची आवक काहीशी मंदावल्याने दरात वाढ झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत कोबी, घेवडा, गवार, दोडक्याच्या दरांत वाढ झालेली दिसते. अननस व तोतापुरी आंब्यांची आवक कमालीची वाढल्याने फळबाजार या दोन फळांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. आवक कमी झाल्याने कांदा मात्र चांगलाच वधारला आहे.
कोल्हापूर : पावसामुळे भाजीपाल्याची आवक काहीशी मंदावल्याने दरात वाढ झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत कोबी, घेवडा, गवार, दोडक्याच्या दरांत वाढ झालेली दिसते. अननस व तोतापुरी आंब्यांची आवक कमालीची वाढल्याने फळबाजार या दोन फळांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. आवक कमी झाल्याने कांदा मात्र चांगलाच वधारला आहे.
गेल्या आठ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीतील भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यात स्थानिक भाजीपाल्याची आवक पूर्णपणे ठप्प असल्याने दर वाढले आहेत.
बाजार समितीत २०० पोती कोबी, तर ४०० पोती ओल्या मिरच्यांची आवक होते. कारली, गवार, भेंडी, दोडक्याची आवकही कमी झाल्याने दर चांगलेच तेजीत आहेत. घेवड्याची आवक सुरू झाली असून मागणी अधिक असल्याने दर चांगलेच भडकले आहेत.
घेवड्याचा दर घाऊक बाजारात ५५ रुपये, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे. कोथिंबिरीची आवक थोडी वाढली असून, दर कमी झाले आहेत. घाऊक बाजारात १२ रुपये पेंढी आहे. मेथी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांची आवक स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही.
पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम दरावर झाला असून घाऊक बाजारात कांदा १५ रुपये किलो झाला आहे. बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारसा चढउतार नसला तरी गेले दोन-तीन महिने घसरलेला लसणाचे दर सुधारण्यास सुरुवात झाली आहे.
पावसामुळे फळबाजारामध्ये थोडी शांतता दिसत असली तरी तोतापुरी आंबा व अननसची आवक चांगली आहे. कोल्हापुरात तोतापुरी आंब्याची रोज १५ टन आवक होत आहे.
कर्नाटकातून अजून आंब्याची आवक होत आहे. रायवळ, दशेरी आंबा बाजारात दिसत आहे. डाळिंबाची आवक व दर स्थिर आहे. लिंबूची आवक कमालीची वाढली असून, दर एकदमच खाली आले आहेत. लहान लिंबू रुपयांना दोन मिळत आहेत.
साखर, तूरडाळ, हरभरा डाळीसह सर्वच डाळींचे दर तुलनेने स्थिर आहेत. सरकी तेल, खोबरेल व शेंगतेलाच्या दरातही फारशी चढउतार दिसत नाही. पोहे, शाबूदाण्याच्या दरात थोडीफार वाढ झालेली दिसते.
मक्याच्या कणसांची आवक वाढली
मक्याच्या कणसांची आवक वाढली आहे. पावसाचा जोर जसा वाढेल तशी मागणीही वाढत आहे. घाऊक बाजारात सरासरी पाच रुपये कणीस मिळत असले तरी किरकोळ बाजारात दहा रुपये दर आहे.