कोल्हापूर : अकृषक कराला ‘कोल्हापूर चेंबर’चा विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ मार्चला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:24 AM2018-03-09T11:24:51+5:302018-03-09T11:24:51+5:30
अकृषक कर आणि रूपांतरीत कराविरोधात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजने आंदोलन पुकारले आहे. हे कर रद्द करावेत या मागणीसाठी दि. १६ मार्चला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
कोल्हापूर : अकृषक कर आणि रूपांतरीत कराविरोधात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजने आंदोलन पुकारले आहे. हे कर रद्द करावेत या मागणीसाठी दि. १६ मार्चला सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये कोल्हापुरातील उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.
चेंबर आॅफ कॉमर्सच्या कार्यालयात गुरुवारी बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष ललित गांधी होते. कोल्हापुरातील व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना अकृषक कर आणि रूपांतरीत कर करण्यासाठी तहसीलदार कार्यालयामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
या नोटिसांमध्ये अनेकपटीने भरमसाठ कर लागू केला आहे. यापूर्वीसुद्धा या करास व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना विरोध नोंदविला होता. या कराची महाराष्ट्रात इतरत्र कुठेही अंमलबजावणी होत नाही. हे कर अन्यायी, अवाजवी असल्याने त्याला विरोध दर्शविण्याचा ‘कोल्हापूर चेंबर’तर्फे आयोजित बैठकीत घेण्यात आला.
संबंधित कर रद्द करावेत, अशी मागणी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासह दि. १६ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले, अशी माहिती उपाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली. या बैठकीस आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, शिवाजीराव पोवार, हरिभाई पटेल, धनंजय दुग्गे, नयन प्रसादे, राहुल नष्टे, वैभव सावर्डेकर, महेश धर्माधिकारी, अजित होनोले, रमेश कारवेकर, महेश सामंत आदी उपस्थित होते.