कोल्हापूर : मनपा आरोग्याधिकाऱ्यांचा बंगला फोडला, लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 07:10 PM2018-03-31T19:10:03+5:302018-03-31T19:10:03+5:30
साळोखेनगर पाण्याच्या टाकीजवळील महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ दिलीप पाटील यांच्या बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे शुक्रवारी (दि. ३०)उघडकीस आले. बंगल्याच्या सभोवती सीसीटीव्ही बसविण्यात आले असले तरी चाणाक्ष चोरट्यांनी त्याचा डीव्हीआर चोरून नेला.
कोल्हापूर : साळोखेनगर पाण्याच्या टाकीजवळील महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ दिलीप पाटील यांच्या बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे शुक्रवारी (दि. ३०)उघडकीस आले. बंगल्याच्या सभोवती सीसीटीव्ही बसविण्यात आले असले तरी चाणाक्ष चोरट्यांनी त्याचा डीव्हीआर चोरून नेला.
याबाबतची अधिक माहिती अशी, साळोखेनगरमध्ये कॉलनीच्या सुरुवातीलाच डॉ. पाटील (वय ६८) यांचा ‘दौलत’ बंगला आहे. गुरुवारी (दि. २९) ते पत्नी व मुलासह बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी रात्री घरी आले असता बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी गज कापलेले दिसले.
बेडरुमधील तिजोरीतील साहित्य विस्कटलेले होते. त्यातील कानातील सोन्याच्या कुड्या, अंगठी, सीसीटीव्ही कॅमेºयाचा डीव्हीआर, मोबाईल, रोख रक्कम ४३ हजार असा सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे दिसून आले.
डॉ. पाटील यांनी सुरक्षेसाठी बंगल्याच्या सभोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. हा प्रकार चोरट्यांचा लक्षात आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला. याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.