कोल्हापूर : पोलिसांनो, तणावापासून दूर रहा : विश्वास नांगरे-पाटील, पोलीस कल्याण सप्ताह समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:34 AM2018-06-09T11:34:34+5:302018-06-09T11:34:34+5:30
पोलीस दलात काम करताना ताण-तणावापासून दूर राहिले पाहिजे. तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. कुटुंबीयांना शक्य तेवढा वेळ देऊन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, असे मार्गदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना केले. अलंकार हॉल येथे आयोजित केलेल्या पोलीस कल्याण सप्ताह समारोप समारंभात ते बोलत होते.
कोल्हापूर : पोलीस दलात काम करताना ताण-तणावापासून दूर राहिले पाहिजे. तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. कुटुंबीयांना शक्य तेवढा वेळ देऊन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, असे मार्गदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना केले. अलंकार हॉल येथे आयोजित केलेल्या पोलीस कल्याण सप्ताह समारोप समारंभात ते बोलत होते.
जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस कल्याण निधीच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी गेल्या चार दिवसांपासून मुख्यालयातील अलंकार हॉल येथे पोलीस कल्याण सप्ताहाचे आयोजन केले होते.
सप्ताहामध्ये आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती व्याख्यान, डॉ. प्रांजली धामणे यांची ‘आहार’ या विषयावर कार्यशाळा, शेती व दुग्धव्यवसायाची आवड असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यान, आदी कार्यक्रम पार पडले. शुक्रवारी या सप्ताहाचा समारोप होता.
प्रमुख पाहुणे नांगरे-पाटील यांच्या हस्ते २०१७-१८ शैक्षणिक वर्षात गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, दप्तर-पुस्तक अनुदान, शैक्षणिक अग्रीम, पदव्युतर पदवी अशा पाल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये निखिल शिंदे, अमित व्हटकर, मेहवीन शेख, सिद्धेश परीट, प्रदीप पाटील, रूपाली गुरव, करुणा कांबळे, शुभंकर नलवडे, रवींद्र पाटील, रितूल नाकील, भक्ती पाटील, समीक्षा पुजारी, अनघा हजारे, जास्मीन गवंडी यांचा समावेश होता. तसेच विशेष पोषण आहार अनुदान, सुदृढ बालिका अनुदानप्राप्त सहा महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अनुदानाचे वितरणही करण्यात आले.
पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलिसांसाठी चार वर्षांतून दोन दिवसांची मोफत सहल असते, तिचा लाभ घ्यावा. शासकीय योजनांची अनेकांना माहिती नसते, ती जाणून घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने, शाहूवाडी विभागाचे उपअधीक्षक आर. आर. पाटील, शहर उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, तानाजी सावंत, अशोक धुमाळ, संजय मोरे, दिलीप जाधव, अनिल गुजर, शहाजी निकम यांच्यासह कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
आदर्श पोलीस वसाहतींना बक्षीस
जिल्ह्यातील पोलीस वसाहतींसाठी आदर्श पोलीस वसाहत स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- नवीन पोलीस वसाहत, मुख्यालय, द्वितीय - कुरुंदवाड पोलीस ठाणे वसाहत, तृतीय - लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे वसाहत यांनी मिळविला. त्यांना अनुक्रमे पाच, तीन व दोन हजार रुपये बक्षीस विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
पोलीस ठाण्यांना पुस्तिकांचे वाटप
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी व विशेष शाखांना पोलीस कल्याण उपक्रमाच्या योजनांबाबतची माहिती असणाऱ्या तीन हजार पुस्तिका, ४०० भित्तीपत्रके, ४० डिजिटल बॅनर्स यांचे वाटप करण्यात आले.