कोल्हापूर : पुणे-बंगलोर महामार्गावर औषधी तेलाच्या बॅरेलला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:29 PM2018-01-01T17:29:49+5:302018-01-01T17:34:35+5:30
पुणे-बंगलोर महामार्गावर तावडे हॉटेल येथे ट्रकमधील औषधी वनस्पती तेलाच्या बॅरेलला गळती लागून उग्र वास सुटला. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने बॅरेल बाहेर काढून गळती थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी (दि. ३१) रात्री घडली.
कोल्हापूर : पुणे-बंगलोर महामार्गावर तावडे हॉटेल येथे ट्रकमधील औषधी वनस्पती तेलाच्या बॅरेलला गळती लागून उग्र वास सुटला. अग्निशामक दलाच्या जवानांनी क्रेनच्या साहाय्याने बॅरेल बाहेर काढून गळती थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी (दि. ३१) रात्री घडली.
अधिक माहिती अशी, रोहा येथून केरळला ट्रक (टी. एन. २८ ए. सी. ४४२८) हा औषधी वनस्पतीसाठी (अॅसिट्राईल क्लोराईड) लागणारे २५ तेलाचे बॅरेल भरून पुणे-बंगलोर महामार्गावरून निघाला होता.
रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तावडे हॉटेल परिसरात येताच मोळा लागून एका बॅरेलमधून तेल बाहेर पडू लागले. त्याचा हवेत उग्र वास पसरल्याने चालक राजेंद्रन के. (रा. तमिळनाडू) याने रस्त्याकडेला ट्रक थांबविला. वास अतिउग्र असल्याने तो हळू-हळू हवेत पसरू लागला.
या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांचा त्याचा त्रास होऊ लागला. येथील काही नागरिकांनी अग्निशामक दलास वर्दी दिली. जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहायाने बॅरेल बाहेर काढले. त्याची गळती थांबवून ते पुन्हा ट्रकमध्ये ठेवले.