कोल्हापुरात पावसाचा जोर कमी, पण धोका कायम, स्थलांतरास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 06:02 PM2018-07-18T18:02:39+5:302018-07-18T18:05:34+5:30
कोल्हापूर जिल्हा आणि शहराचा पुराचा धोका कायम असून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे पाणी कोल्हापूर शहर आणि गावांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला होता.
कोल्हापूर : जिल्हा आणि शहराचा पुराचा धोका कायम असून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे पाणी कोल्हापूर शहर आणि गावांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला होता.
सकाळी आणि संध्याकाळी ऊनही पडले होते. मात्र धरणक्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार असल्याने पुन्हा पाण्याची पातळी वाढतच जाणार आहे.
मंगळवारी (दि. १७) रात्रीपर्यंत शहर आणि जिल्ह्यात संततधार सुरू होती. मात्र बुधवारी सकाळी आठवड्यातून पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. संध्याकाळीही शहरात ऊन पडले होते; परंतु तरीही पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरूनच वाहत असल्याने अजूनही धोका संपलेला नाही.
जिल्ह्यातील ८४ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गगनबावड्याजवळही रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरून कोकणात जाणारी वाहतूक थंडावली आहे.
जिल्ह्यातील १0 राज्यमार्ग, २४ प्रमुख जिल्हा मार्ग, १२ ग्रामीण मार्ग, १६ इतर जिल्हा मार्ग पाण्यामुळे बंद असून, त्याचा फटका एस.टी.सह खासगी वाहतुकीलाही बसला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने हातकणंगले तालुक्यातील कृष्णाकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.
पुराचे पाणी गावांत शिरल्याने हातकणंगले तालुक्यातील रुई, इंगळी, कुरुंदवाड येथील २५ कुटुंबांतील ८८ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातही पंचगंगेचे पाणी घुसल्याने सुतारवाड्यातील १७ कुटुंबे सुरक्षित स्थळी हलविण्यात आली असून, मुस्लिम बोर्डिंग आणि चित्रदुर्ग मठामध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुराचा धोका वाढण्याची शक्यता
एकीकडे कोयना धरणातून पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील गावांना हा धोका निर्माण झाला आहे; तर दुसरीकडे, दोन दिवसांत कोल्हापुरात ९४ टक्के भरलेल्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातील.
परिणामी पंचगंगेच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होणार आहे. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या जयंती नाल्याचे पाणी नदीत जाऊ शकत नसल्याने हेच पाणी काठावर इतरत्र पसरून शहरातील सखल भागांत आणि नाल्याच्या काठच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होणार आहे.
प्रशासन सज्ज
या परिस्थितीमुळे प्रशासनदेखील सज्ज झाले असून, महापालिकेने आणि प्रशासनाने २४ तास आपली पथके तैनात केली आहेत. रत्नागिरीकडे जाणारा शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तेथे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.