कोल्हापूर : मिरवणुकीत साउंड सिस्टीम चालणार नाही : प्रशांत अमृतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:55 PM2018-09-20T12:55:19+5:302018-09-20T12:58:33+5:30
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीम चालणार नाही. कोणी तसा उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित मंडळाची सिस्टीम जाग्यावर जप्त करून गुन्हा दाखल केला जाईल, अशा कडक सूचना शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील २५ ते ३० मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्या.
कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीम चालणार नाही. कोणी तसा उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित मंडळाची सिस्टीम जाग्यावर जप्त करून गुन्हा दाखल केला जाईल, अशा कडक सूचना शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील २५ ते ३० मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्या.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मंडळांच्या बैठका घेऊन साउंड सिस्टीममुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. काही मंडळांनी साउंड सिस्टीमचा वापर करणार नाही, असे लेखी दिले आहे.
दरवर्षी ऐन मिरवणुकीत शिवाजी पेठ, मंगळवार पेठेतील काही उपद्व्यापी मंडळे साउंड सिस्टीमचा वापर करतात. मिरवणुकीत घुसण्याचा प्रयत्न करतात. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होऊन मिरवणूक अनेक तास रेंगाळली जाते. अशा प्रकारची पुनरावृत्ती घडू नये, याची खबरदारी म्हणून शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी बुधवारी सायंकाळी सहा वाजता शिवाजी मंदिरात प्रमुख २५ ते ३० मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर डॉ. अमृतकर यांनी मिरवणुकीत साउंड सिस्टीम चालणार नाही. पारंपरिक वाद्यांचा वापर करा, मिरवणुकीचा आनंद घ्या. कोणी साउंड सिस्टीमचा आग्रह धरून पोलिसांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. साउंड सिस्टीम घेऊन येणाऱ्यांना मिरवणुकीत प्रवेश तर दिला जाणार नाहीच; त्याचबरोबर सिस्टीम जागेवर जप्त करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.
साउंड सिस्टीमला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. तूर्तास या सिस्टीमला उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही. ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या साउंड सिस्टीमला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे शक्य नाही, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करा, पोलिसांना सहकार्य करा, अशा सूचना दिल्या. बैठकीस दयावान, अवचित, हिंदवी, बालगोपाल, खंडोबा, बी.जी.एम., आदींसह तालीम मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.