कोल्हापूर : नव्या पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट, शिवाजी पूल : शुक्रवारीही काम चालणार; वाहतूक बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 07:33 PM2018-02-08T19:33:10+5:302018-02-08T19:50:51+5:30
ब्रिटीशकालीन शिवाजी पुलाचे आर्युमान संपल्याने या पुलासोबतच गुरुवारी नवीन पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही शिवाजी पूल दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. हे काम शुक्रवारी दुपारपर्यंत चालण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविली आहे. ध्रुव कन्सल्टन्सी प्रा. लि.च्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईच्या स्ट्रक्टवेल डिझायनर्स एजन्सीमार्फत हे काम सुरू आहे.
कोल्हापूर : ब्रिटीशकालीन शिवाजी पुलाचे आर्युमान संपल्याने या पुलासोबतच गुरुवारी नवीन पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही शिवाजी पूल दिवसभर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. हे काम शुक्रवारी दुपारपर्यंत चालण्याची शक्यता अधिकाºयांनी वर्तविली आहे. ध्रुव कन्सल्टन्सी प्रा. लि.च्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईच्या स्ट्रक्टवेल डिझायनर्स एजन्सीमार्फत हे काम सुरू आहे.
गुरुवारीही दिवसभरात मेजर ब्रिज इन्स्पेक्शन युनिटला जोडलेल्या बकेटच्या साहाय्याने अभियंत्यांनी शिवाजी पुलाच्या खाली जाऊन पुलाची कमान, आर्च स्लॅब, दोन कॉलमचे अंतर यांचे टोटल स्टेशन युनिटच्या सहाय्याने मोजमाप केले.
या नवीन युनिटमुळे पुलाचे मोजमाप अचूकपणे मोजता आले. याशिवाय इंडोस्कोपी मशीनची वायर पुलाच्या दोन दगडामध्ये आत घुसवून पुलाच्या आतील परिस्थितीचा अंदाज घेतला. या अत्याधुनिक मशीनद्वारे पुलाच्या आतील बाजूस असणारे दगड निखळले असल्याच्या शक्यतेने ही चाचणी करण्यात आली.
ही इंडोस्कोपी मशीनद्वारे दिवसभर चाचणी सुरू होती. दुपारनंतर रडारसारख्या मशीनचा वापर करून जीपीआर टेस्ट (पुलाची भार क्षमता चाचणी) घेण्यात आली. त्यामुळे किती अवजड क्षमतेच्या वाहनांचा भार पूल पेलू शकतो याची माहिती घेण्यात आली.
दरम्यान, शिवाजी पुलाचे आर्युमान संपले असून या पुलाला १४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शेजारी उभारलेल्या पर्यायी पुलाचेही काम वादात अडकल्याने हे काम गेली तीन वर्षे अर्धवट स्थितीत रेंगाळले आहे.
हा अर्धवट स्थितीत उभारलेल्या पर्यायी पुलाच्या बाजूला नदीतील पुराच्या पाण्याचा मारा मोठ्या प्रमाणावर असल्याने या अर्धवट स्थितीतील पुलाची क्षमताही या पथकाने तपासली. या पर्यायी पुलाचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले.
या नवीन पुलामध्ये वापरण्यात आलेली सळई (स्टील), सिमेंटचे ग्रेड आदींची तपासणीही या स्ट्रक्टवेल डिझायनर्समार्फत करण्यात आली. या नवीन पुलावर कोअर कटर या मशीनद्वारे वेगवेगळ्या चार ठिकाणी १०० मि.मी.चे खड्डे पाडून त्याची कोअर नमुन्यासाठी काढण्यात आली आहे.
गुरुवारी हे काम सुरू असताना मुंबईच्या ध्रुव कन्सल्टन्सी प्रा. लि. या कंपनीच्या अभियंत्यांसह राष्टÑीय रस्ते महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता संपत आबदार, व्ही. जी. गुळवणी, सहायक अभियंता प्रशांत मुंगाटे, आदी अधिकारी उपस्थित होते.
कोअरची प्रयोगशाळेत तपासणी
नवीन पुलावर कटरद्वारे काढण्यात आलेल्या चारही कोअर कंपनीच्या मुंबईतील प्रयोगशाळेत तपासण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलासाठी वापरण्यात आलेल्या सिमेंटचा दर्जा, गुणवत्ता, याचबरोबर वापरलेल्या स्टीलची काय स्थिती आहे याचीही तपासणी होणार आहे.
त्यामुळे ‘युएसपी, रिबॉन हॅमर व हाफसेल’ अशा तीन वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती जितेंद्र भुजबळ स्ट्रक्टवेल डिझायनर्स ब्रिज एक्स्पर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट इंजिनिअर पवन कदम, टेक्निकल डायरेक्टर जयंत कदम यांनी दिली.