कोल्हापूर : भोसलेवाडीत अवैध बांधकाम तोडताना पेटवून घेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 06:30 PM2018-03-15T18:30:06+5:302018-03-15T18:31:11+5:30
बांधकाम परवानगी व्यतिरिक्त सेटबॅक जागेत जादा केलेले बांधकाम पाडायला गेलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीव्र विरोध करीत एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे भोसलेवाडी परिसरात गुरुवारी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याने पुढील प्रसंग टळला. यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी आपली कारवाई स्थगित ठेवली.
कोल्हापूर : बांधकाम परवानगी व्यतिरिक्त सेटबॅक जागेत जादा केलेले बांधकाम पाडायला गेलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीव्र विरोध करीत एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे भोसलेवाडी परिसरात गुरुवारी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्याने पुढील प्रसंग टळला. यामुळे मनपा अधिकाऱ्यांनी आपली कारवाई स्थगित ठेवली.
याबाबत मनपा अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती अशी की, भोसलेवाडी येथील अॅपल हॉस्पिटलजवळील (सि.स.नं. ६०८/२) मिळकतीमध्ये कुंडलिक कोटकर यांनी दोन मजली घर बांधले आहे. सेटबॅकसाठी सोडावयाच्या जागेत जिना व एक रूमचे बांधकाम केले आहे.
कोटकर यांनी जादा बांधकामाची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे शेजारील इमारतींना मिळणारा सुर्यप्रकाश रोखला गेला. याबाबत शेजारील मिळकतधारकांनी लोकशाहीदिनात आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करून आयुक्तांनी सेटबॅकमध्ये येणारे अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. यानुसार गुरुवारी सकाळी नगररचना विभागाने सकाळी दहा वाजता कारवाई सुरू केली.
त्यावेळी कोटकर यांनी महापालिकेच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिल्याचे सांगितले. स्थगितीबाबतची कागदपत्रे सादर करा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर महापालिका व त्यांच्या विधितज्ज्ञांशी बोलल्यानंतर स्थगिती आदेश नसल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू करताच कुंडलिक कोटकर यांच्या लहान मुलाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. घडल्या प्रकाराने पोलिसांसह यंत्रणेची मोठी धावपळ उडाली.
पोलिसांनी धावत जाऊन कोटकर यांना अडविले तसेच बाजूला केले. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. परिणामी, कारवाई स्थगित करण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला. यावेळी कनिष्ठ अभियंता पद्मल पाटील व सुरेश पाटील यांच्यासह नगररचना व ताराराणी विभागीय कार्यालयाचे कर्मचारी व पोलीस उपस्थित होते.