कोल्हापूर : ‘पुजारी हटाओ’चा निर्णय अधिवेशनात घ्या, पुजारी हटाओ समितीतर्फे शिवाजी चौकात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:02 PM2018-03-05T17:02:35+5:302018-03-05T17:02:35+5:30
करवीर निवासीनी अंबाबाई मंदीरातील पुजारी हटाओचा शब्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळून या विधीमंडळ अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पुजारी हटाओ समितीतर्फे सोमवारी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. हटाओ...हटाओ...पुजारी हटाओ...’‘मंदीर आमच्या हक्काचे...’अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कोल्हापूर : करवीर निवासीनी अंबाबाई मंदीरातील पुजारी हटाओचा शब्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाळून या विधीमंडळ अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पुजारी हटाओ समितीतर्फे सोमवारी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. हटाओ...हटाओ...पुजारी हटाओ...’‘मंदीर आमच्या हक्काचे...’अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दुपारी साडेबाराच्या सुमारास अंबाबाई मंदीर पुजारी हटाओ समितीचे सदस्य छत्रपती शिवाजी चौकात एकवटले. या ठिकाणी अंबाबाई मंदीरातील पुजारी हटवा आणि शासननियुक्त पुजारी नेमावा, पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द या अधिवेशानत पाळावा, अंबाबाईच्या नावान चांगभल अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून अंबाबाई मंदीरातील पुजारी हटवून शासनाकडून पगारी पुजारी नेमावेत यासाठी लढा सुरु आहे. यामध्ये अंबाबाईच्या भक्तांचाही समावेश आहे. मंदीर किंवा मंदीर परिसरात पावित्र्य राखण्यासाठी तसेच शांतता भंग होऊ नये, यासाठी संयमाने रस्त्यावरचा हा लढा सुरु आहे.
यासंदर्भात पालकमंत्री पाटील यांनी समितीला कोणत्याही परिस्थितीत शासननियुक्त पगारी नेमू तसेच प्रसंगी तसा वटहुकुम काढू असे अनेकवेळा आश्वासन दिले आहे. त्यांनी दिलेला शब्द येणाऱ्या विधीमंडळाच्या अधिवेशन पाळा, याची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर आर. के. पोवार, सुजित चव्हाण,बाबा पार्टे, राजेश लाटकर, अनिल कदम, दुर्गेश लिंग्रस, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, दिलीप पाटील, विराज पाटील, राजू यादव, विनायक फाळके, राजेंद्र पाटील इंद्रजीत सावंत, सुनील देसाई, अॅड. चारुलता चव्हाण, जहीदा मुजावर, अभिजीत बुकशेठ आदी सहभागी झाले होते.
तामिळनाडूच्या धर्तीवर कोल्हापूरातही निर्णय घ्यावा
तामिळनाडूतील मयुरानाथस्वामी मंदीरातील देवीला सलवार कमिज घातल्याबद्दल तेथील पुजाऱ्याला हटविले. त्याप्रमाणे कोल्हापूरातील अंबाबाई मंदीरातील पुजाऱ्याबाबतही तामिळनाडूच्या धर्तीवर निर्णय घ्यावा, असे दिलीप पाटील यांनी सांगितले.