कोल्हापूर : टोमॅटो दहा रुपयांना दीड किलो, वाढत्या उष्म्याने लिंबू तेजीत, भाजीपाल्याच्या दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:27 AM2018-03-19T11:27:33+5:302018-03-19T11:27:33+5:30
वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फारसा चढउतार पाहावयास मिळत नाही.
कोल्हापूर : वाढत्या उष्म्याने शीतपेयांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून, त्याचा परिणाम लिंबंूच्या दरावर झाला आहे. किरकोळ बाजारात पिवळाधमक लिंबू चार ते पाच रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बाजारात टोमॅटोंची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो, तर किरकोळ दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो मिळत आहे.
बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण सुरू आहे. तुलनेत कडधान्यासह साखरेच्या दरात फारसा चढउतार पाहावयास मिळत नाही. गेले आठ दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पाऊस येत असला तरी वातावरणातील उष्मा काही कमी नाही. उष्मा रोज वाढतच जात असल्याने शीतपेयांची मागणी वाढली आहे.
विशेष करून सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या व शरीरास पोषक असणाऱ्या लिंबू सरबताला थोडी जादाच मागणी आहे. त्यामुळे लिंबंूची मागणी वाढली असून आठवड्यात दोन रुपयांवरून पाच रुपयांपर्यंत लिंबू पोहोचला आहे.
फळबाजारात संत्री, सफरचंद, द्राक्षे, चिक्कू, कलिंगडांची रेलचेल असून उठावही असल्याने दरात फारसा चढउतार दिसत नाही. कलिंगडांची आवक जास्त सुरू असून सरासरी दहा ते वीस रुपये नग असा दर आहे. द्राक्षे ५० रुपये किलो, तर चिक्कू २० पासून ५० रुपये किलोपर्यंत दर आहे.
स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण सुरू आहे. किरकोळ बाजारात वांगी, ढबू २० रुपये किलो, तर गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, दोडका तीस रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
काकडीची आवकही वाढत आहे. परिणामी दरांत हळूहळू घसरण सुरू असून साधारणत: तीस ते चाळीस रुपये किलो दर आहे. मेथी, कोथिंबीर, पोकळा, पालकाची आवक स्थिर असल्याने दरात चढउतार दिसत नाही.
पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात गुळाला असणारी मागणी थोडी कमी झाली असून साखरेचे दर स्थिर राहिले आहेत. कडधान्य, डाळीचे दर स्थिर आहेत. कांदा-बटाट्याचे दर स्थिर असून लसणाच्या दरात मात्र थोडी घसरण झाली आहे.
हापूसची आवक वाढली
कोल्हापूर बाजार समितीत हापूस आंब्याची आवक वाढली असून रोज दीड हजार बॉक्स कोकणासह कर्नाटकातून येत आहेत. घाऊक बाजारात सरासरी ७५० रुपये बॉक्स, तर १८०० रुपये पेटीचा दर राहिला आहे.
टोमॅटो दहा रुपयांना दीड किलो
टोमॅटोंची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात १ ते ५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात दहा रुपयांना दीड किलो टोमॅटो मिळत आहे.