कोल्हापुरातील टाऊन हॉल उद्यानातील दीडशेहून दुर्मीळ वनस्पतींचा ठेवा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:31 AM2018-09-10T00:31:26+5:302018-09-10T00:31:29+5:30
सचिन भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहराला लाभलेली चित्रपरंपरा, ब्रिटिश मराठाकालीन शस्त्रास्त्रे, असा इतिहासाचा प्राचीन ठेवा असलेल्या कोल्हापूरच्या टाऊन हॉलमधील उद्यानात शतकोत्तर वर्षे गाठलेल्या १५० हून अधिक दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन केले आहे; मात्र, अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे हा अमूल्य ठेवा धोक्यात आला आहे. यात ‘भद्राक्ष, मधुमेहावरील दुर्मीळ ‘कणुंगा’ सीता अशोक, रंजन, ताराफळ, कैलासपती, आदी वनस्पतींचे जतन व संवर्धन केले जात आहे. अशाप्रकारचे राज्यातील एकमेव उद्यान आहे.
सात एकर जागेत विस्तारलेल्या या उद्यानात ‘भद्राक्ष’, ही रुद्राक्ष वर्गीयांतील वनस्पतींसह अमृतफळ, ब्रह्मदंडा, सीता अशोक, सीता रंजन, कदंबा, ताराफळ, कैलासपती, मुचकुंद, पुत्रावंती, सुकुणा, प्लॅटोफर्म, शिरीष, करंज, गुलमोहर, रेन ट्री, सायकस पाम, ट्रॅव्हल पाम, पारोशिया पिंपळ, महागणी, चाफ्याचे विविध प्रकार, बकुळ, बेरडा, बॅरिंगटोनिया, पारकीया, कॅम्पर, आदी बहुउपयोगी १५० हून अधिक वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे. यात नव्याने ‘यांगयांग’ अर्थात ‘क णुंगा’ या वनस्पतीचेही संवर्धन केले जात आहे. या रोपांवर संशोधन करून येथील तीन कर्मचाºयांनी १०० रोपांची नव्याने निर्मिती केली आहे. या वनस्पतीचा उपयोग मधुमेहावरील औषध म्हणून उपयोग केला जात आहे. अशा एक ना अनेक दुर्मीळ वनस्पती या उद्यानात पाहण्यास मिळतात; पण त्यांच्या संवर्धनासाठी पुरेशा प्रमाणात कर्मचारीवर्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उद्यान विभागाकडे नाही. या उद्यानात २००७ पूर्वी ४७ कर्मचारी वर्ग होता. सुधारित आकृतीबंधानुसार या उद्यानात केवळ तीनच कर्मचारी शिल्लक उरले आहेत. निवृत्त झाल्यानंतर नव्याने भरती न झाल्याने या उद्यानाचा कारभार केवळ आऊटसोर्सिंगवर चालविला जात आहे; त्यामुळे कदाचित काही झाडे वटल्यानंतर ती आपोआप पडली, तर अनेक वनस्पती दुर्मीळच होतील. अशी भीती अनेक व्यक्त केली जात आहे.
शंभर वर्षांपूर्वीचा ‘रेन ट्री!’
या उद्यानातील १00 वर्षांहून अधिक काळचा एक रेन ट्री आहे. त्याच्या काही फांद्या भाऊसिंगजी रोडवर एका बाजूने झुकल्या आहेत. त्या कापल्या नाहीत, तर एखादी दुर्घटना घडून मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. म्हणून टाऊन हॉल उद्यान अधीक्षकांनी त्या फांद्या कापण्यासाठी सन २००४ ते २०१८ पर्यंत प्रत्येक वर्षी महानगर पालिकेच्या वृक्षसंवर्धन समितीची परवानगी घेतली आहे; पण अद्यापही येथे बदलून आलेल्या एकाही उद्यान अधीक्षकांकडून कापण्याचे धाडस झालेले नाही; त्यामुळे कोल्हापुरातील पर्यावरणप्रेमी जनतेची वृक्ष संवर्धनाबद्दलची जाणीव किती आहे. यापेक्षा दहशत कशी आहे, याची जाणीव होते. हे विशेषच म्हणावे लागेल.