कोल्हापूर : आरक्षणविरोधक, समर्थकांत भाजपचा भांडणे लावण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 02:33 PM2018-06-28T14:33:12+5:302018-06-28T14:38:44+5:30
आरक्षणविरोधक आणि आरक्षणसमर्थक यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप ‘भारिप-बहुजन महासंघा’चे संस्थापक-अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
कोल्हापूर : आरक्षणविरोधक आणि आरक्षणसमर्थक यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप ‘भारिप-बहुजन महासंघा’चे संस्थापक-अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
धनगर, घिसाडी, कैकाडी समाज यांना स्वातंत्र्यानंतर अद्यापही लोकसभा प्रतिनिधित्व मिळालेले नाही. अशा वंचित समाजाला लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे, ही भूमिका साकारण्यासाठी सर्व समाजबांधवांच्या सहमतीने ‘वंचित बहुजन आघाडी’ची स्थापना केली.
आघाडीचा जाहीरनामा तयार करण्याच्या पार्श्वभूमीवर आघाडीचे अध्यक्ष अॅड. आंबेडकर यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून झाली. त्याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
अॅड. आंबेडकर म्हणाले, लोकशाहीचा लाभ सर्वांना सारखाच मिळावा यासाठी आम्ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. केवळ लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी, पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षांसोबत दोस्ती करण्यास तयार आहोत. मात्र विधानसभेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढविणार आहोत.
लोकसभा निवडणुकीत संबंधित पक्षाने २ जागा धनगर समाजाला, २ माळी, २ भटके विमुक्त आणि लहान ओबीसींना, २ मुस्लिम समाजाला आणि २ अनुसूचित जाती-जमातींना अशा १० जागा दिल्या पाहिजेत; तरच ही आघाडी होऊ शकते; अन्यथा सर्वच्या सर्व ४८ जागा आम्ही स्वबळावर लढवू, असेही ते म्हणाले.
शासनाने सचिव पातळीवरील नोकरभरतीतून आरक्षण मोडीत काढण्याचे षड्यंत्र सुरू केले आहे; पण भाजपचा तो डाव आम्ही हाणून पाडू, असाही इशारा त्यांनी दिला. यावेळी सर्वश्री. माजी आमदार अॅड. विलासराव मोरे, हरिभाऊ भदे, लक्ष्मण माने, धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंगतात्या शेंडगे, अशोकराव बन्नेनवार, आदी उपस्थित होते.
भाजप-सेनेशी युती नाही
धर्मवादी, जातीयवादी संघटनेकडे आज विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही. फक्त दंगल घडविणे हाच त्यांचा हेतू आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेशी आगामी निवडणुकीत युती केली जाणार असल्याचेही अॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आता हिंदू-मुस्लिम दंगली घडत नाहीत; त्यामुळे आर. एस. एस. आता होमहवन व यज्ञ करीत आहे. आरक्षणाविरोधात वादळ उभे करण्यासाठी लोकांना शपथ दिली जात आहे. हा सर्व अराजकता माजविण्याचाच प्रकार आहे, असेही ते म्हणाले.
आंबेडकरांना मुख्यमंत्री करणार : लक्ष्मण माने
सोलापूर आणि पुण्यात धनगर समाजाचा मेळावे झाले. तेथे वंचित घटकांना निवडून आणून अॅड. प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला असल्याचे माजी आमदार लक्ष्मण माने म्हणाले.
लोकसभेच्या १०, विधानसभेच्या ५० जागा लढविणार
लोकसभेच्या १०, तर विधानसभेच्या ५० जागा लढविणार असल्याचे सांगून अॅड. आंबेडकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत वंचित घटकांना प्राधान्य देणाऱ्या पुरोगामी पक्षांना चर्चेसाठी आपल्या आघाडीचे दरवाजे खुले आहेत.