कोल्हापूर : रामानंदनगरातील दोघा चेन स्नॅचरना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:26 AM2018-08-23T11:26:41+5:302018-08-23T11:28:34+5:30
दुचाकीवरून भरधाव वेगाने येऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून लांबविणाऱ्या दोघा चेन स्नॅचरच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या.
कोल्हापूर : दुचाकीवरून भरधाव वेगाने येऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून लांबविणाऱ्या दोघा चेन स्नॅचरच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या.
पंकज प्रताप भोसले (वय ३०), साईनाथ मनोहर शिरदवाडे (वय २७, दोघेही रा. ७८५/५, पोवार कॉलनी, रामानंदनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे असून, त्यांनी हॉकी स्टेडियम, रामानंदनगर, पाचगाव या परिसरांत केलेले सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीची ७० ग्रॅम वजनाची सात मंगळसूत्रे व दोन दुचाकी असा सुमारे २ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना न्यायालयाने दि. २७ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत.
या चोरीप्रकरणी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शहर, उपनगरांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसडा मारून नेऊन पोबारा करणाºया चेन स्नॅचरनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते.
या चोरट्यांच्या शोधमोहिमेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन चेन स्नॅचरना पकडण्यासाठी व्यूहरचना केली. त्यानुसार जानेवारी २०१८ पासून घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हा घडलेल्या ठिकाणी वारंवार भेटी देऊन गोपनीय बातमीदारामार्फत चोरट्यांचा माग काढला. त्यानुसार चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
सराफ दुकानानजीक चेन स्नॅचरना पकडले
दुचाकीवरून गुजरीत एका सराफाकडे दागिने विक्रीसाठी दोन युवक येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून भोसले व शिरदवाडे यांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडून चोरीतील दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.
गुन्ह्याची ठिकाणे
आर. के.नगर सहजीव हौसिंग सोसायटी, हॉकी स्टेडियम येथील विश्वपंढरी नगरी, रामानंद नगर ते पाचगाव, आय.टी.आय. ते नाळे कॉलनी, नागाळा पार्क, हनुमाननगर ते पाचगाव या रोडवर दोघांनी महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले.
चोरटे आतेभाऊ
पंकज भोसले व साईनाथ शिरदवाडे हे नात्याने आतेभाऊ असून त्यांनी चैनीसाठी हे गुन्हे केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले.
या महिलांचे दागिने लुटले
कुसुम विठ्ठल साळवी (रा. दीपलक्ष्मी, द्वारकानगर, पाचगाव), सई अमोल देसाई (रा. योगेश्वर कॉलनी, पाचगाव), फराना अनिस शेख (रा. खंडोबा देवालय, रामानंदनगर,), पूनम संदीप साबळे (रा. ७३१, नाळे कॉलनी), मीरा सागर कुलकर्णी (रा. हनुमाननगर, पाचगाव रोड), सुचिता यशवंत गाडगीळ (रा. यशोदा अपार्टमेंट, नागाळा पार्क) या महिलांची मंगळसूत्रे चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.