कोल्हापूर : अडीच लाख रुपये लाचप्रकरणी कागल तहसीलदारांसह दोन तलाठी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:45 PM2018-05-17T19:45:44+5:302018-05-17T19:45:44+5:30
सुळकुड (ता. कागल) येथील जमिनीच्या ७/१२ पत्रिकेवर नाव नोंद करण्यासाठी कागल तहसीलदारांसह दोन तलाठ्यांना अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाने गुरुवारी पकडले.
कोल्हापूर : सुळकुड (ता. कागल) येथील जमिनीच्या ७/१२ पत्रिकेवर नाव नोंद करण्यासाठी कागल तहसीलदारांसह दोन तलाठ्यांना अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाने गुरुवारी पकडले.
महिला तलाठी शमशाद दस्तगीर मुल्ला
लाचेतील अडीच लाख रुपयांची रक्कम या दोन तलाठ्यांनी कागल तहसीदार कार्यालयात स्वीकारली. तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे यांच्या सांगण्यावरून ही रक्कम स्वीकारल्याचे तलाठ्यांनी पोलिसांना सांगितले.
मनोज आण्णासो भोजे
तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे (वय ४४, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) महिला तलाठी शमशाद दस्तगीर मुल्ला (४३), मनोज आण्णासो भोजे (४२, दोघे रा. कसबा सांगाव, ता. कागल) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
तक्रारदार संजय धोंडिराम जगताप (रा. कसबा सांगाव) यांच्याकडून संशयितांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. सुमारे दहा वर्षांपूर्वी कोल्हापूर विक्रीकर भवन येथे अशीच कारवाई झाली होती.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजय जगताप यांच्या वडिलांनी सुळकुड येथील जमीन गटनंबर ४४३ मधील ७६ आर. ही जमीन सन २०१२ ला खरेदी केली आहे. या जमिनीचे ७/१२ पत्रकी नांव नोंद होण्यासाठी सुळकुडच्या तलाठी शमशाद मुल्ला हिच्याकडे अर्ज दिला होता. तहसीलदार घाडगे यांची भेट घेतली असून त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ७/१२ पत्रकी नांव नोंद करण्याकरिता मला एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी मुल्लाने त्यांच्याकडे केली.
तहसीलदार यांची आता बदली होणार आहे. ते तुमचे काम करून देण्यास तयार आहेत. त्यासाठी त्यांना दोन लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपयांची मागणी मुल्ला हिने जगताप यांच्याकडे केली.
बुधवारी (दि. १६) मुल्ला यांनी घरी कसबा सांगाव येथे भेट घेण्यासाठी जगताप यांना बोलाविले. त्याप्रमाणे एक लाखपैकी ५० हजार रुपये आता द्या व नंतर ५० हजार रुपये द्या, असे सांगून गुरुवारी पैसे घेऊन कागल तहसीलदार कार्यालयात येण्यास त्यांना सांगितले. तत्पूर्वी, जगताप यांनी मंगळवारी (दि. १५) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी लाचेची पडताळणी केली असता ती निष्पन्न झाली.
त्यामुळे पोलिसांनी कागल तहसीलदार कार्यालयात सापळा रचला. तहसीलदार घाडगे यांनी मुल्ला हिला पैसे स्वीकारण्यास दुजोरा दिल्यावरून व मुल्ला यांच्या सांगण्यावरून तलाठी मनोज भोजे यांनी घाडगे यांच्याकरिता दोन लाख रुपये जगताप यांच्याकडून गुरुवारी स्वीकारले.
त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून मुल्ला हिने ५० हजार रुपयांची रक्कम कार्यालयाच्या तळमजल्यात स्वीकारली. यावेळी मुल्ला हिने रक्कम स्वीकारून तिच्यासोबत असलेल्या तलाठी मनोज भोजे याच्याकडे ही रक्कम दिली. मुल्ला हिला पोलिसांनी रंगेहात पकडले तर भोजे हा पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, पोलीस नाईक आबासाो गुंडणके, संदीप पावलेकर, रुपेश माने, महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया पाटोळे, पोलीस नाईक विष्णू गुरव आदींनी केली. कागल पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.