कोल्हापूर : वि.स. खांडेकर व्याख्यानमाला, यशवंतरावांच्या राजकारणाला साहित्याची प्रेरणा : चौगुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:46 PM2018-01-06T15:46:21+5:302018-01-06T15:52:23+5:30
साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प्रेरणा होती, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सहदेव चौगुले यांनी शुक्रवारी केले.
कोल्हापूर : साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प्रेरणा होती, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सहदेव चौगुले यांनी शुक्रवारी केले.
करवीर नगर वाचन मंदिरतर्फे आयोजित वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत त्यांनी साहित्यिक यशवंतराव चव्हाण या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार मराठे होते.
चौगुले म्हणाले, राजकीय व्यक्तींनी साहित्यात लुडबूड करू नये, असा एक सूर असतो तो यशवंतरावांच्याही काळात होता. मात्र, भिन्न मार्गांनी चालणारी ही दोन्ही माणसे समाज आणि मानवहित या एकाच उद्देशाने काम करत असतात. किंबहुना अनेक साहित्यिक राजकारणातही तितक्याच मुक्तपणे संचार करत असलेले आपल्याला दिसतात. सावरकर, नेहरू, गदिमा, अटलबिहारी वाजपेयी, एपीजे अब्दुल कलाम, डॉ. राधाकृष्णन अशा अनेक नेत्यांच्या साहित्यकृतीही तितक्याच दर्जेदार आहेत.
ते म्हणाले, यशवंतरावांचे राजकीय गुणधर्म त्यांच्या साहित्यातही आढळतात. सामान्यजनांचे हित साधणारे माध्यम म्हणून त्यांनी साहित्याकडे पाहिले. मराठी साहित्यात माझी भूमिका वाचकांची आहे, असे म्हणणाऱ्या यशवंतरावांचा शब्दांच्या सामर्थ्य आणि सौंदर्यावर नितांत विश्वास होता. त्यांच्या प्रत्येक शब्दाला सामाजिक अर्थ आहे.
गेली ४० वर्षे मी यशवंतरावांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या साहित्यात आणि कृतीत प्रत्येकवेळी एक कसलेला राजकारणी साहित्यिकाच्या अंगाने उलगडताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आपल्यासमोर येतात.
डॉ. रमेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनिषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित भोसले यांनी आभार मानले.