कोल्हापूर : योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:08 PM2018-04-25T12:08:02+5:302018-04-25T12:08:02+5:30
प्रख्यात स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक आणि योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केरळ येथील अलपेटा येथील त्यांची कन्या कविता श्रेयांस यांच्याकडे राहण्यासाठी ते गेले होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले असताना हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.
कोल्हापूर : प्रख्यात स्टेम सेल प्रत्यारोपण शल्य चिकित्सक आणि योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे बुधवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. केरळ येथील अलपेटा येथील त्यांची कन्या कविता श्रेयांस यांच्याकडे राहण्यासाठी ते गेले होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले असताना हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. सायंकाळी सहा वाजता हवाई रुग्णवाहिकेने त्यांचे पार्थिव कोल्हापूरात आणण्यात येणार आहे.
डॉ. गुंडे यांचे मूळ गाव कर्नाटकातील बोरगाव (ता. चिकोडी) हे आहे. व्यवसायासाठी ते कोल्हापूरात स्थायिक झाले. दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दल या युवक शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
डॉ. गुंडे हे नामांकित अस्थिरोगतज्ज्ञ असले तरी त्यांची खरी ओळख योगगुरु अशीच होती. त्यांनी प्रदीर्घ काळ योगाचा प्रसार आणि प्रचार केला. त्यांचे संपूर्ण आयुष्य योग आणि प्राणायाम याच्याशी निगडित होते. त्यांची प्रेरणा घेउन अनेकांनी योगाचे धडे त्यांच्या शिबिरातून घेतले. आतापर्र्यत त्यांचे ९00 हून अधिक योगशिबिरे झाली असून ९0१ वे शिबिर पुढील महिन्यात कोल्हापूर मुक्कामी होणार होते.
योगाच्या प्रसारासाठी तसेच प्रशिक्षणासाठी त्यांनी देशाच्या विविध भागातून तसेच परदेशातही शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. योगक्षेत्रातील अपूर्व योगदानाबद्दल त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेने कोल्हापूर भूषण हा पुरस्कार देउन गौरविले होते.
१९६६ पासून ते अस्थिरोगविषयक सल्लागार म्हणून कार्यरत होते. अस्थिरोगविषयक शस्त्रक्रिया आणि काही प्रमुख संस्थांमधील स्टेम सेल प्रत्यारोपणाचे त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. डॉ. गुंडे यांचे शाहुपुरीत कृष्णा नर्सिंग होम हे रुग्णालयत आहे. देशातील सर्वात मान्यताप्राप्त स्टेम सेल थेरपी डॉक्टर्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे अनेकांनी गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया देखील केली आहे.
औषधोपचार शिस्तीतील सर्वात प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त प्रॅक्टीशनर्सपैकी एक असा त्यांचा नावलौकिक होता. अफाट विश्वसनीयता आणि वैद्यकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव त्यांनी मिळविला होता. मुलांमधे तसेच प्रौढांमधील पाठीचा कणा आणि अस्थी विकृती सुधारण्याशी संबंधित मस्कुलोस्केलेटल या प्रणालीशी संबंधित समस्यांशी ते संबंधित आहेत. अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय केंद्रामधून त्यांनी विशेष प्रशिक्षण प्राप्त केले होते.