कोल्हापूर जिल्हा परिषदेत बदल्यांचा हंगाम सुरू, संघटना पदाधिकाऱ्यांच्याही बदल्या अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:11 AM2018-05-03T11:11:40+5:302018-05-03T11:11:40+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांचा हंगाम सुरू झाला असून येत्या दि. ९ आणि १० मे रोजी याबाबतची अंतिम समुपदेशन प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाही कर्मचारी संघटनांच्या पात्र पदाधिकांच्या बदल्या अटळ मानल्या जात आहेत. अध्यक्षा शौमिका महाडिक यांची वेळ घेऊन या बदली वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांचा हंगाम सुरू झाला असून येत्या दि. ९ आणि १० मे रोजी याबाबतची अंतिम समुपदेशन प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाही कर्मचारी संघटनांच्या पात्र पदाधिकांच्या बदल्या अटळ मानल्या जात आहेत. अध्यक्षा शौमिका महाडिक यांची वेळ घेऊन या बदली वेळापत्रकावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
सर्वसाधारणपणे मे महिन्यामध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यामध्ये सर्व विभागांच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. ज्याला ४ वर्षे एका ठिकाणी पूर्ण झाली आहेत तो विनंती बदलीसाठी अर्ज करतो. त्या ठिकाणी जागा रिक्त असल्यास त्याची तिथे बदली केली जाते.
प्रशासकीय बदलीमध्ये एखाद्या ठिकाणी १० वर्षे सेवा केली असल्यास त्याची बदली केली जाते. एखाद्याने एखाद्या तालुक्यात १० वर्षे सेवा केली असेल तर तो अन्य ११ तालुके किंवा मुख्यालयात बदली मागू शकतो. विनंती आणि प्रशासकीय बदल्यांचे अर्ज मागविण्यात आले असून आता त्याची वर्गवारी सुरू आहे तसेच नेमक्या कोणत्या आणि किती जागा रिक्त आहेत याचीही अंतिम आकडेवारी संकलित केली जात आहे.
गतवर्षी जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या सर्व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर हे प्रकरण चिघळले होते. २ जानेवारी २०१७ च्या शासन आदेशाचा आधार घेत या पदाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
या निर्णयाविरोधात पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती तेव्हा ज्या संघटना ग्रामविकास विभागाकडे नोंद आहेत, त्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत फेरविचार करू, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी घेतली होती.
त्यावर औद्योगिक न्यायालयात सुनावणीही घेण्यात आली. दरम्यान, या पदाधिकाऱ्यांनीच याबाबतची याचिका मागे घेऊन बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याची भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर यंदाही कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.
दोन दिवसांत पदाधिकारी निवड
वित्त विभागातील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने १५ वर्षे मुख्यालयात काम केल्यानंतर आता बदली होणार असल्याने दोनच दिवसांत एका संघटनेच्या पदाधिकारीपदी आपली निवड करून घेतली आहे, तसे पत्रही प्रशासनाला दिल्याचे समजते. पंधरा दिवसांपूर्वी संघटनेत पदाधिकारी नसलेला हा कर्मचारी बदली होऊ नये यासाठी पदाधिकारी झाला आहे.
गतवर्षी आम्ही कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्या के ल्या होत्या. यावर संघटना न्यायालयात गेल्यानंतर त्यांनी आपली याचिका मागे घेतली. आम्हीही ग्रामविकास विभाग व आयुक्त कार्यालयाचे मार्गदर्शन मागविले तर कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांच्या बदल्या करणे संयुक्तिक असल्याचे ठरविण्यात आले. त्यामुळेच यंदाही असे काही पदाधिकारी बदलीसाठी पात्र असतील तर त्यांच्या बदल्या केल्या जातील.
चित्रीकरण होणार
जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात समुपदेशनाद्वारे या बदल्या होतील. विनंती अर्ज करणाऱ्याला बोलावून त्याला रिक्त जागा दाखविल्या जातील. त्यानुसार बदली केली जाईल. त्याच ठिकाणी बदलीचे ठिकाण निश्चित केले जाईल. त्यामुळे ‘गाठीभेटी’वरही मर्यादा येणार असून या संपूर्ण बदली प्रक्रि येचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.