‘केएसबीपी’ ने खुलवले कोल्हापूरचे सौंदर्य

By admin | Published: October 22, 2016 09:29 AM2016-10-22T09:29:27+5:302016-10-22T09:29:27+5:30

‘नावासाठी नाही तर फक्त कोल्हापूरकरांसाठी’ अशी संकल्पना घेऊन काही मित्रमंडळींनी कोल्हापूर सुशोभिकरणाचा ध्यास घेतला.

'KSBP' opens the beauty of Kolhapur | ‘केएसबीपी’ ने खुलवले कोल्हापूरचे सौंदर्य

‘केएसबीपी’ ने खुलवले कोल्हापूरचे सौंदर्य

Next

ऑनलाइन लोकमत, संतोष तोडकर

कोल्हापूर, दि. २२ -  ‘नावासाठी नाही तर फक्त कोल्हापूरकरांसाठी’ अशी संकल्पना घेऊन काही मित्रमंडळींनी कोल्हापूर सुशोभिकरणाचा ध्यास घेतला. सुशिक्षित आणि अभ्यास असलेले उद्योजक मित्र एकत्रित आले आणि त्यांनी रस्ते सौंदयीकरणाचे काम सुरू केले. रस्त्याच्या दुभाजकाजवळील माती गोळा केली. दुभाजकावर, आयलॅँडवर, रस्त्यांच्या कडेला छोटी-मोठी झाडे लावली. एवढेच नव्हे तर त्यांनी कोल्हापूरचे सौंदर्यही खुलविले. एका छोट्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘केएसबीपी’च्या प्रयत्नाने शहरातील चौक, दुभाजक हिरवीगार बनली आहेत.

गेल्यावर्षी कोल्हापुरातून टोल हद्दपार झाला आणि रिंगरोडवरील दुभाजकांची अवस्था दयनीय झाली. छोटी-मोठी झाडे-झुडपे वाळू लागली. याला पाणी घाण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला. तरीही कोल्हापूरच्या सौंदर्यात भर पडेल यासाठी काही तरी केले पाहिजे याचा ध्यास वनस्पतीशास्त्रातून पदवी घेतलेल्या एका तरुणाने घेतला त्यांनी १५ नोव्हेंबरपासून शहरातील विविध चौक, आयलॅँडचा सर्व्हे सुरू केला. एक त्यावर आधारित ‘अ‍ॅक्शन फिल्म’ तयार केली. आयटीतील मित्र आर्किटेक्चर आणि इतरांनी त्याला सहकार्य केले तेथून पुढे कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालण्याची चळवळ सुरू झाली.

महापालिका आयुक्तांशी चर्चा करून परवानगीदेखील मिळविली. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, शाहू नाका ते शिवाजी विद्यापीठ पोस्ट आॅफिस, शिवाजी विद्यापीठ पोस्ट आॅफिस ते सायबर चौक, सायबर-संभाजीनगर पेट्रोल पंप या मार्गावरील दुभाजकाजवळील माती गोळा करण्याचे काम त्यांनी सुरू केले. बघता-बघता शहरातील प्रमुख दुभाजकांजवळील माती गोळा केली. एकूण तीस टन माती जमा झाली. दुभाजकांमधील अस्ताव्यस्त झाडा-झुडपांना आकार दिला. काही ठिकाणी सौंदर्यात भर पडेल अशी झाडेही लावली. महिन्या-दीड महिन्यांपूर्वी रोपट्याएवढे काम बघता-बघता वटवृक्षाचा आकार घेऊ लागला. काय आहे हा प्रकल्प, कोण आहे याचे प्रमुख, कशा पद्धतीने शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे, याकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले.

कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १० जूनला या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा झाला. गेल्या चार महिन्यांत शहरातील ३५ आयलँडचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये तावडे हॉटेल, कावळा नाका, धैर्यप्रसाद हॉल, सीपीआर चौक, बिंदू चौक, देवल क्लब चौक आदी शहरातील प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे तसेच वाढदिवसानिमित्त भेट म्हणून जमा झालेली सुमारे पंचवीस हजार रोपे शिवाजी विद्यापीठ परिसरातील विविध भागांत लावण्यात आली. कोल्हापूर शहरातील एकूण पंधरा किलोमीटरचे अंतर्गत रस्ते ‘केएसबीपी’च्या संकल्पनेतून हिरवीगार बनली आहेत. त्या रस्त्यांवरील झाडांची नीगा राखणे, पाणी घालणे, माती स्वच्छ करणे, वाढलेल्या झाडांना योग्य आकार देण्यासाठी सुमारे ३५ कर्मचारी राबत आहेत.

या प्रकल्पासाठी आजवर सुमारे वीस लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांनी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’ (सीएसआर)मधून मदत केली आहे तसेच अन्य निधी देगणी स्वरुपात प्रकल्पासाठी प्राप्त झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील विविध भागांत कण्हेर, बिट्टी, टिकोमा, बोगम वेल आदी प्रकारच्या फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. आजपर्यंत शहरातील रस्त्यांवरील दुभाजकांच्यामध्ये असणारी एकूण ८७ टन माती गोळा करून तिची विल्हेवाट लावण्यात आली आहे तसेच फुलझाडांना उपयुक्त अशी नऊ टन माती दुभाजकांमध्ये घालण्यात आली आहे.

केएसबीपी म्हणजे काय? ‘कोल्हापूर स्ट्रीट ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट’ अर्थात ‘कोल्हापूर रस्ते सौंदयीकरण प्रकल्प’ होय. सुजय पित्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पामुळे शहरातील चौक, रिंगरोडचा कायापालट झाला आहे. कोणताही राजकीय पक्ष, महापालिका, तालीम, संघटना, मंडळ, संस्था यांचे हे काम नाही, ते काम आहे पित्रे व त्यांच्या मित्रपरिवारांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नांतून शहराचे सौंदर्य खुलले आहे.

स्वयंसेवक होण्यासाठी आवाहन

या प्रकल्पाची माहिती या वेबसाइटवर उपलब्ध असून आजवरचे त्यांचे त्यांचे काम तेथे पाहण्यास मिळते. याच याच वेबसाईटच्या माध्यमातून ‘मिस कॉल द्या, सहभागी व्हा’ ही संकल्पना राबविली गेली व स्वयंसेवक होण्यासाठी आवाहन करण्यात आले. ज्यांना कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालायची आहे, ते कोणीही या प्रकल्पात योगदान देऊ शकतात व सहभागी होऊ शकतात. गेल्या चार महिन्यांत शहरातील सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी या प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची उत्सुकता दर्शविली आहे. लवकरच त्यांची ‘शॉर्ट लिस्ट’ करून त्या-त्या भागातील झाडांची निगा राखण्यासाठी त्यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.

नावासाठी नाही

लोकांसाठी प्रकल्प राबविताना काम करणे, निधी देणे अशा कोणत्याही पातळीवर मदत केली तरी कोणाचेही नाव कोठेही वापरले जात नाही. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. केवळ लोकचळवळ म्हणून हा प्रकल्प पुढे यावा, अशी स्वयंसेवकांची इच्छा आहे. 

Web Title: 'KSBP' opens the beauty of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.