कन्यागत महापर्वकाल १२ आॅगस्टपासूनच

By admin | Published: August 7, 2016 11:36 PM2016-08-07T23:36:04+5:302016-08-07T23:36:04+5:30

नृसिंहवाडीत पुरासाठी प्रशासन सज्ज : पाऊस असला तरी ठरलेल्या वेळेतच होणार सोहळा

Kyaayyat Maha Parva on August 12 | कन्यागत महापर्वकाल १२ आॅगस्टपासूनच

कन्यागत महापर्वकाल १२ आॅगस्टपासूनच

Next

प्रशांत कोडणीकर ल्ल नृसिंहवाडी
कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी कितीही वाढली, कितीही मोठा पाऊस झाला, तरी कन्यागत महापर्वकाळ ठरलेल्या १२ आॅगस्टपासून यशस्वीरीत्या होणार आहे. मात्र प्रशासन, भाविक, ग्रामस्थ व यात्रेकरूंनी नृसिंहवाडी येथील श्री दत्त देव संस्थानला कन्यागत पर्वकाल चांगल्या व योग्य पद्धतीने पार पाडण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन दत्त देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल पुजारी यांनी केले आहे.
दरम्यान, पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्या-त्या परिस्थितीनुसार ठरलेल्या वेळेत पालखी सोहळ्यास सुरुवात होईल. पावसाळ्याचे दिवस असल्याने भाविक व यात्रेकरूंनी मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या घाटावरती स्नान करून श्रींचे दर्शन घ्यावे, असे सांगून कन्यागत महापर्वकाळाची तयारी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली आहे. भाविक व यात्रेकरूंना वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.
स्टॅण्ड परिसरात प्रवाशांना पावसापासून संरक्षण करण्याकरिता दहा हजार स्क्वेअर मीटरचा कापडी मंडप, तर ग्रामपंचायतीच्या पार्किंगच्या जागेवर सात हजार स्क्वेअर मीटरचा मंडप घालण्यात येत आहे. दत्त मंदिराकडे जाण्यासाठी बालाजी हॉटेलपासून वन-वे करण्यात आला आहे. तर पार्किंगशेजारी व रिक्षास्टॉपशेजारी मोठ-मोठे चप्पल स्टॅण्ड उभारण्यात येत आहेत. १२ आॅगस्टला भाविकांची गर्दी लक्षात घेऊन संपूर्ण नृसिंहवाडी गाव नो-व्हेईकल्स करण्यात आले आहे. शिरोळचे तहसीलदार सचिन गिरी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी धनंजय पाटील, शिरोळ-कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे बी. डी. कदम, कुमार कदम हे उपस्थित राहून परिस्थितीची माहिती घेत आहेत. दत्त देवस्थानने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाविकांसाठी दर्शन रांगा, मुख दर्शन बॅरेकेटिंग, पिण्याच्या पाण्याची सोय, ठिकठिकाणी कापडी मंडप उभारण्यात येत आहेत.
श्री दत्त देवस्थान व्यवस्थापन ११ व १२ आॅगस्टला होणाऱ्या कन्यागत महापर्वकालानिमित्त काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला असून, पुराचे पाणी कमी झाल्यास श्रींच्या मुख्य मंदिरात शिवाय श्री नारायण स्वामींच्या मठातून पालखी सोहळ्याची तयारी सुरू केली आहे.
गुरुवारी (दि.११ आॅगस्ट) पहाटे ५ वाजता श्री दत्त मंदिरात काकड आरती, षोडोशोपचार पूजा होऊन सकाळी ८ ते ११ या वेळेत पंचामृत अभिषेक व इतर सेवा होतील. ११.३० वा. श्रींच्या कमल चरणावर महापूजा, नैवेद्य, आरती होईल.
त्यानंतर धूपदीप होऊन प. पू. नारायणस्वामींच्या मंदिरातून श्रींची उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात आणण्यात येईल. प्रार्थना होऊन इंदुकोटी स्रोताने पालखीची सुरुवात दुपारी २ वा. होईल. श्रींची पालखी पेठभाग ग्रामपंचायत, मरगुबाई मंदिर ओतवाडी, मुख्य रस्ता मार्गे शुक्लतीर्थ येथे रात्री उशिरा पोहोचेल.
शुक्रवारी (दि.१२) सकाळी सूर्याेदयावेळी म्हणजेच ६.२० वा. श्रींचे कृष्णा नदीत विधिवत पर्वकाल स्नान होईल. यानंतर पूर्व परंपरेनुसार पुण्याहवाचन, गंगापूजन, आदी धार्मिक कार्यक्रम होऊन श्रींची पालखी पुन्हा ओतवाडी, मुख्य रस्ता मरगुबाई चौक, मधली गल्ली, गवळी कट्टा, पेठभाग या मार्गे मुख्य मंदिरात रात्री उशिरा पोहोचेल.
त्यानंतर शेजारती असा कार्यक्रम होणार असल्याने भाविक व यात्रेकरूंनी कन्यागत पर्वकाल चांगल्या व योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. देवस्थानची अधिकृत शुक्लतीर्थ ही स्मरणिका व देणगी देवस्थानच्या मंदिरातच जमा करावी, असे आवाहन श्री दत्त देव संस्थानने केले आहे.

Web Title: Kyaayyat Maha Parva on August 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.