पन्हाळा परिसरात बिबट्याचा बैलावर हल्ला, लोक जमा झाल्यानंतर काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:56 AM2017-12-01T10:56:12+5:302017-12-01T10:59:47+5:30
पन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आपटी गावात बुधवारी दुपारी बैलगाडी घेउन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा झाल्याने जमा झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे बिबट्याने पळ काढला.बैलांनी बैलगाडीसह शेजारील शेतात पळ काढल्याने बैल बचावले, पण बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पन्हाळा : पन्हाळा आणि परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आपटी गावात बुधवारी दुपारी बैलगाडी घेउन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बैलावर बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा झाल्याने जमा झालेल्या लोकांच्या गर्दीमुळे बिबट्याने पळ काढला.
पन्हाळा आणि परिसरातील समृद्ध जंगलामुळे येथे अनेक वन्यप्राणी, पशुपक्षी आहेत. बिबट्याचाही वावर पूर्वापार आहे. परंतु गेली काही वर्षे या परिसरात बिबट्याचे अस्तित्व नव्हते. परंतु या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे बुधवारी सिध्द झाले.
बुधवारी दुपारी भैरोबाच्या मंदिराजवळील रहिवाशी पांडुरंग गुंडा गिरीगोसावी हे आपल्या शेताकडे बैलगाडी घेवुन येत असता बैलाच्या मागील पायावर दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यामुळे भयभित झालेल्या बैलांनी बैलगाडीसह शेजारील शेतात पळ काढल्याने बैल बचावले, पण बैलगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान शेतकरी पांडुरंग गिरिगोसावी आणि त्यांचा मुलगा स्वप्नील यांनी आरडा ओरडा केल्यानंतर परीसरातील लोक तेथे जमा झाले, यामुळे बिबट्या पळुन गेला. याच परिसरात मोठ्या प्रमाणात कोंबडी पालन व्यवसाय सुरु आहे. स्थानिक शेतकऱ्यांची घरेही या परिसरातच आहेत. विशेष म्हणजे महिलांचे वास्तव्य या परिसरात जादा आहे.
आपटी परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. वनविभागाने याचा बंदोबस्त करावा, या बिबट्याला पकडुन दुरच्या जंगलात सोडण्यात यावे.
अमर पाटील,
सरपंच, आपटी.