कुष्ठरोग नियमित औषधोपचाराने हमखास बरा होतो : डॉ. एल. एस. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:53 PM2017-10-02T13:53:05+5:302017-10-02T13:56:17+5:30
कोल्हापूर दि. 2: कुष्ठरोग हा त्वरीत निदानामुळे व नियमित औषधोपचारामुळे हमखास बरा होतो. या रोगाविषयी शास्त्रीय माहिती घेवून मनातील अंधश्रध्दा आणि गैरसमज दूर करा, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांनी आज येथे केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुष्ठरोग निवारण निर्धार दिन येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये साजरा करण्यात आला त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ. पाटील बोलत होते.
कार्यक्रमास कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. हर्षला वेदक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख, माहिती अधिकारी एस. आर. माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र फाळके, डॉ. शीतू जैनखाने आदीजण उपस्थित होते.
कुष्ठरोग कोणालाही होवू शकतो मात्र बहुविध औषधोपचाराने तो शंभर टक्के बरा होवू शकता. हा आजार गंभीर नसून पूर्ण बरा होणारा आहे. या रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक देणे, कोणताही भेदभाव न करणे गरजेचे आहे. कुष्ठरोगाची तपासणी व औषधोपचाराची सोय सर्व शासकीय, निमशासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे इत्यादि ठिकाणी मोफत उपलबध असून, कुष्ठरोगाची संशयित लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीने नजिकच्या शासकीय दवाखान्यात जावून तपासणी व औषधोपचार घेण्याचा सल्लाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिला.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पाहुण्यांच्या हस्ते आदरांजली वाहिली. प्रारंभी कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. हर्षला वेदक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शेवटी अवैद्यकीय पर्यवेक्षक संतोष नागपूरकर यांनी आभार मानले.